बाबा रामदेव कोरोनावरील आयुर्वेदीक औषध लाँच करणार, औषध 100 टक्के गुणकारी असल्याचा दावा

कोरोनाचा इलाज करणारे औषध आपल्याला सापडल्याचा दावा पतंजलीचे आचार्य बाळकृष्ण यांनी केला होता. त्यापाठोपाठ बाबा रामदेव यांनीही हा दावा केला होता. या औषधाचे नाव ‘कोरोनिल’ असे ठेवण्यात आले असून मंगळवारी म्हणजेच 23 जूनला दुपारी 12 वाजता हे औषध बाजारात उतरवले जाणार आहे.

दुपारी 12 वाजता हरिद्वारच्या पतंजली योगपीठामध्ये या औषधाचे लाँचिंग करण्यात येणार आहे. योगगुरू रामदेव बाबा हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. गुळवेल, तुळस, श्वसारी, अश्वगंधा सारख्या औषधींचा वापर या औषधामध्ये करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. गुळवेल आणि अश्वगंधायुक्त औषध ज्या रुग्णांना दिले त्यांचे बरे होण्याचे प्रमाण 100 टक्के असल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यूदर शून्य टक्के असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. पतंजली संस्थेचे मुख्य संशोधकांनी याबाबत बोलताना सांगितले की जानेवारी महिन्यात चीनमध्ये कोरोना विषाणूने धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती, तेव्हापासूनच पतंजलीने कोरोनावर औषध शोधण्याचे काम सुरू केले होते. शेकडो संशोधकांनी दिवस रात्र मेहनत घेत हे औषध तयार केले, या औषधामुळे आजवर हजारो रुग्ण बरे झाल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे.

कोरोनाचे विषाणू प्रामुख्याने श्वसनयंत्रणेवर हल्ला करतात, यामुळे कोरोना रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो आणि शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाणही कमी होते. हा विषाणू शरिरात प्रवेश केल्यानंतर झपाट्याने संपूर्ण शरिरामध्ये पसरतो. आजा आजार जीवघेणा असून जगभरात या आजारावर औषध शोधण्यासाठी संशोधने सुरू आहे. काही दिवसांपूर्वी ग्लेनमार्क या औषधनिर्मिती करणाऱ्या कंपनीने कोरोनावर गुणकारी औषध सापडल्याचे सांगितले होते. गोळ्यांच्या स्वरुपातील हे औषध 103 रुपये प्रतिगोळी या दराने बाजारात आणणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या