
जालना जिल्ह्यातील आंतरवली येथे घडलेल्या लाठीमाच्या विरोधात रविवारी पुकारलेल्या पाथर्डी बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. तर मोहटादेवी फाटा येथे अज्ञात तरुणांनी टायर जाळून आपला निषेध व्यक्त केला. रविवारी सकाळी या घटनेच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवावीत,असे आवाहन करत शहरातून फेरी काढण्यात आल्या. नंतर नाईक चौकात सभा घेण्यात आली.
मराठा समाजाच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनस्थळी अचानक पोलीस येतात व लाठीचार्ज करतात, हा प्रकार मानवतेला काळिमा फासणारा आहे. या घटनेत महिला,वारकरी यांच्यावर सुद्धा कारण नसताना लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचा जबाब देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला हवा. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा, मी पुन्हा येईल असे म्हणत फडणवीस यांनी राज्याचे वाटोळे केले आहे. फडणवीस यांनी 2014 साली मराठा,धनगर, ओबीसी व मुस्लिम आरक्षणाचे गाजर दाखवून सत्ता मिळवली. मात्र आरक्षणाचा गुंता मात्र वाढून ठेवला असल्याचे अॅड.प्रताप ढाकणेयांनी सांगितले.



























































