पाथर्डी – वृद्धेश्वर मंदिरात चोरी, कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी चार दानपेट्या फोडल्या

हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस येथील श्री वृद्धेश्वर देवस्थान मंदिरामध्ये चोरी झाली. चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून मंदिरात प्रवेश केला आणि चार दानपेट्या फोडून त्यातील रक्कम लंपास केली. हा सर्व प्रकार मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चार अज्ञात चोर वृद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागून आले व त्यांनी मंदिराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चार दान पेट्या उचलून नेल्या. त्यानंतर मंदिराच्या पाठीमागील नदीजवळ या दानपेट्या फोडून त्यातील रक्कम लंपास केली.

चोरीची माहिती मिळताच पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक योगेश राजगुरू, सहाय्यक पोलीस निरीक्षक कौशल्यनिरंजन वाघ यांच्यासह स्वानपथक तसेच ठसेतज्ञ तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. चोरट्यांना तात्काळ अटक करा अशी मागणी देवस्थानचे विश्वस्त मुरलीधर पालवे यांनी केली आहे.