
पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी रोडवरील केळवंडी शिवारात इथेनॉल वाहतूक करणारा टँकर पलटी होऊन पेटला. या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला. टँकरमधील अन्य चौघे जखमी झाले असून, त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सकाळी घडलेल्या या घटनेत टँकर जळून खाक झाला.
गणेश रामराव पालवे (वय 42, रा. पालेवाडी), सुरैया बशीर शेख (वय 46, रा. माळी बाभूळगाव, ता. पाथर्डी) अशी मृतांची नावे आहेत. लहू सांडू पवार (वय 53), सुमन लहू पवार (वय 49), जगदीश जगन पवार (वय 3), कोमल जगन पवार (वय 7, रा. विसरवाडी, ता. पैठण) टँकरचा चालक दादासाहेब केकाण (रा. पालवेवाडी) अशी जखमींची नावे आहेत.
अपघातानंतर टँकरमधील पाचजणांना सुखरूप बाहेर काढण्यास स्थानिकांना यश आले. टँकरचा दुसरा चालक गणेश पालवे व सुरैया बशीर शेख हे दोघे टँकरमध्ये अडकल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे, नितीन दराडे, राम सोनवणे, अल्ताफ शेख, सुहास गायकवाड, किशोर लाड, प्रल्हाद पालवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाथर्डी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने टँकरची आग आटोक्यात आणली. त्यानंतर पोलिसांनी आगीमध्ये मृत झालेल्या व्यक्तींची ओळख पटविली.



























































