
सामाईक विहिरीतील पाणी आधी कोणी घ्यायचे? या कारणावरून एका युवकाची कुऱहाडीचा घाव घालून खून केल्याची घटना तालुक्यातील वडगाव येथे सोमवारी मध्यरात्री घडली. भागवत मारुती गर्जे (रा. वडगाव, ता. पाथर्डी) असे मृताचे नाव असून, भागवत ऊर्फ मिठू भगवान बडे (रा. रामकृष्णनगर, वडगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भागवत बडे व भागवत गर्जे यांची वडगाव येथे सामाईक विहीर असून, आठ दिवसांपासून या विहिरीवरील पंपाला वीजपुरवठा करणारे रोहित्र खराब झाले होते. त्यामुळे वीजपुरवठा झाला नव्हता. सोमवारी हा वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर आधी पाणी कोणी घ्यायचे? यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून बडे याने गर्जे यांच्या डोक्यात कुऱहाडीने वार केला. यात गर्जे यांचा मृत्यू झाला. यानंतर आरोपी बडे याने मृतदेह विहिरीत ढकलून देत तेथून पळ काढला. याप्रकरणी संजय विठ्ठल गर्जे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बडे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविला असून, सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे तपास करीत आहेत.



























































