
शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे पाथर्डी पालिकेने मालमत्ता करात दहा टक्के वाढ केली आहे. यामुळे पालिकेच्या महसुलात मोठय़ा प्रमाणात भर पडणार आहे.
मालमत्ता करात दर चार वर्षांनी वाढ करणे अपेक्षित असताना पाथर्डी पालिकेने यापूर्वी सन 2007 साली करवाढ केली होती. सोळा वर्षे उलटूनही करामध्ये वाढ न केल्याने शासनाने पाथर्डी पालिकेला मालमत्ता करात वाढ न केल्यास 15वा वित्त आयोगाचा निधी दिला जाणार नाही, अशी तंबी दिली होती. अखेर पालिकेने मालमत्ता करात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मालमत्ताकराची आकारणी करण्यासाठी सर्व्हे करण्याचे काम अमरावती येथील स्थापत्य कन्सल्टंट या कंपनीला देण्यात आले. पालिका हद्दीतील प्रत्येक घरात जाऊन मोजमाप घेत या कंपनीने मालमत्तेची माहिती पालिका प्रशासनाला दिली. यापूर्वी पालिका हद्दीत 10 हजार 554 मालमत्ता होत्या व त्यातून पालिकेला 2 कोटी 4 लाखांचे उत्पन्न मिळत होते. नव्या रचनेनुसार आता पालिका हद्दीत असलेल्या मालमत्तेत 1800 ने वाढ होऊन 12 हजार 355 अशी झाली असून, नव्या करवाढीमुळे पालिकेला आता चार कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे.
अनेक मालमत्ताधारकांनी बांधकाम करताना दोन मजले असताना एकाच मजल्याची नोंद केली होती. काही मालमत्ताधारकांनी मालमत्तेची नोंदच केली नव्हती. आता सर्वच मालमत्तांची पालिका दरबारी नोंद झाल्याने कर चुकवेगिरी करणाऱयांना चाप बसणार आहे. मालमत्ता करात केलेल्या वाढीविरोधात तक्रार करण्यासाठी पालिकेने एक महिन्याची मुदत दिली आहे.























































