खबरदारी घ्या… मुंबईला डेंग्यू, मलेरियाचा ‘ताप’! मलेरियाचे 1400, तर डेंग्यूचे 1384 रुग्ण

मुंबईत पावसाळी आजारांचे प्रमाण वाढले असून महिनाभरात मलेरियाचे 1411, तर डेंग्यूचे 1384 रुग्ण आढळले आहेत. शिवाय चिकुनगुनिया, गॅस्ट्रो, हिपॅटायटीस अशा आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पावसाचे पाणी साचून राहत असल्याने दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफॉईड, कॉलरा, जाँडीस असे आजार होतात. तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार पसरतात. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून पावसाळ्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात येते. कीटकनाशक विभागाकडूनही पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धूम्रफवारणी मोहीम व्यापकपणे राबवण्यात येते. तरीदेखील सततच्या पावसामुळे आणि अस्वच्छतेमुळे साथीचे आजार बळावत असल्याचे समोर येत आहे.

अशी घ्या काळजी…

पावसाळी आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

महिनाभरातील रुग्णसंख्या

  • मलेरिया – 1411
  • डेंग्यू – 1384
  • लेप्टो – 143
  • गॅस्ट्रो – 442
  • कावीळ – 176
  • कोविड – 8