
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते पवन खेरा यांनी बुधवारी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर प्रखत हल्ला चढवला आहे. ते म्हणाले की, देशातील लोकशाही संस्थांची विश्वासार्हता कमकुवत होत आहे आणि जनतेलाही आता हे समजले आहे. त्यांनी निवडणूक आयोग, भाजपचे अंतर्गत राजकारण, पंतप्रधानांचे परराष्ट्र धोरण आणि उपराष्ट्रपतींचा राजीनामा याबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची खुर्ची सुरक्षित नसल्याचा दावा त्यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
भाजपच्या संघटनात्मक परिस्थितीवरही त्यांनी हल्ला चढवला आहे. भाजप आता स्वतःचा अध्यक्ष ठरवू शकत नाही. आता भाजप नेतृत्वहीन झाली आहे. पक्षात असा कोणताही चेहरा उरला नाही की ज्याला एकमताने अध्यक्ष बनवता येईल. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची खुर्चीही सुरक्षित नाही आणि त्यांच्याबाबत पक्षात अंतर्गत संघर्ष सुरू आहे, असा दावाही त्यांनी केला.
पवन खेरा यांनी निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित केले. निवडणूक आयोगाने निष्पक्षतेची भूमिका गमावली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. आपण निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो तेव्हा भाजप उत्तर देते आणि जेव्हा आपण भाजपला प्रश्न विचारतो तेव्हा निवडणूक आयोग उत्तर देते. लोकशाहीसाठी हे धोकादायक आहे. जनतेला आता भाजपचा खेळ समजला आहे. देशातील मोटाभाई आणि छोटाभाईंची भीती संपत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
काँग्रेस नेत्याने उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावरही प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की हा राजीनामा संशयास्पद आहे. उपराष्ट्रपतींनी देशासमोर त्यांच्या राजीनाम्याचे कारण स्पष्ट करावे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असताना उपराष्ट्रपतींचा राजीनामा संशय निर्माण करतो. हा काही योजनेचा भाग आहे का? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. पंतप्रधान चीन आणि अमेरिकेला घाबरतात. ते कठीण प्रश्न टाळतात आणि परदेश दौऱ्यांद्वारे देशांतर्गत मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही त्यांनी केला.