पवन खेडा यांचा हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर पुन्हा निशाणा; पत्नीनंतर भावाच्या विदेशी लिंकवर उपस्थित केले प्रश्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसाम निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि काँग्रेस नेते पवन खेरा यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. बुधवारी पवन खेडा यांनी मुख्यमंत्री सरमा आणि त्यांच्या कुटुंबाच्या कथित विदेशी संबंधांवरून पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत.

काँग्रेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पवन खेडा यांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. यामध्ये खेडा यांनी मुख्यमंत्री सरमा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना काही नवीन प्रश्न विचारले आहेत. खेडा म्हटले आहे की, सरमा हे प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी पोलिसांचा धाक दाखवत आहेत. पवन खेडा यांनी दावा केला की, त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या अनुपस्थितीत दिल्लीतील त्यांच्या फ्लॅटवर पोलिसांनी छापा टाकला आणि फोन, लॅपटॉपसह काही उपकरणे जप्त केली. “मी मेवाडचा रहिवासी असून राहुल गांधींचा सिपाही आहे, मी अशा धमक्यांना घाबरणार नाही,” असेही खेडा म्हणाले आहेत.

पवन खेडा यांनी व्हिडीओमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबावर थेट आरोप केले आहेत. त्यांनी विचारले की, इजिप्तचा पासपोर्ट, यूएईचा गोल्डन व्हिसा आणि अँटिग्वाचा पासपोर्ट खरा आहे की खोटा, याची चौकशी व्हायला हवी. तसेच मुख्यमंत्री किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी बनावट केवायसी (KYC) कागदपत्रांच्या आधारे शेल कंपन्या उघडून मालमत्ता खरेदी केली आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले आहेत की, मुख्यमंत्री सरमा यांचा भाऊ आसाम पोलिसात आहे आणि त्यांची पत्नी व मुलगा दुबईत राहतात. त्यांचे मूल दुबई इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकते, ज्याची वार्षिक फी २१ लाख रुपये आहे. हे खरं आहे का? आम्हाला त्या कुटुंबाला राजकीयदृष्ट्या लक्ष्य करायचे नाही, पण आम्हाला फक्त या प्रश्नाचे उत्तर हवे आहे. कारण तुम्ही निवडणुकांकडे पाहत आहात आणि आम्ही आसामच्या जनतेकडे व त्यांच्या अपेक्षांकडे पाहत आहोत.