बनावट केवायसी प्रक्रियेपासून सावधान, पेटीएमचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘पेटीएम’चा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून पेटीएम वापरणाऱ्या ग्राहकांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याच्या नावाखाली बनावट कॉल्स आणि एसएमएसद्वारे फसवणूक केल्याच्या घटना समोर येत आहे. पेटीएम कंपनीने याविरोधात ग्राहकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे. पेटीएमची केवायसी प्रक्रिया ही एजंटशी समोरासमोर भेटून आणि कंपनीद्वारे अधिकृत केलेल्या केवायसी पॉईंटवरच पूर्ण करता येत असल्याचे कंपनीने सांगितले. याकरिता कंपनी एसएमएस अथवा ईमेल पाठविते, ज्याद्वारे ग्राहक एजंटसोबत अपॉइंटमेंट फिक्स करू शकतात आणि केवायसी सेंटर्सची माहिती घेऊ शकतात.

मिळालेल्या माहितीनुसार, फसवणूक करणाऱ्यांनी नवीन पद्धत शोधली असून ज्यात ते पेटीएम ग्राहकांना कॉल करून केवायसीची मर्यादा संपलेली असल्याचे सांगतात. यानंतर ही सेवा पुन्हा सुरु करण्यासाठी ते एनीडेस्क, टीमविव्हर, क्विकसपोर्ट आदी इंस्टॉल करण्याचा सल्ला देतात. यानंतर ९ अंकी कोड एसएमएसद्वारे पाठवून ग्राहकांच्या मोबाईल किंवा लॅपटॉपचा अॅक्सेस स्वत:कडे घेतात. याद्वारे ते कोणत्याही मोबाईल बँकिंग अॅप किंवा पेमेंटशी संबंधित अॅपच्या माध्यमातून व्यवहार करतात ज्यात युपीआय किंवा वॉलेटही सामील आहे.

तसेच या फ्रॉडस्टरद्वारे ग्राहकांना केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगत कॅशबॅक मिळविण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते. परंतु केवायसी संबंधित ऑफर मिळविण्यासाठी पेटीएम किंवा पेटीएमचा कोणताही कर्मचारी कोणतीही लिंक शेअर करीत नसल्याचे देखील पेटीएमच्या वतीने सांगण्यात आले. एखादे अॅप डाउनलोड करण्यासाठी पेटीएमद्वारे कधीच ग्राहकांना कॉल करण्यात येत नसल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तसेच पिन, ओटीपी, पासवर्ड, डेबिट-क्रेडिट कार्डचा पिन यांची देखील विचारणा केली जात नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या फसवणूक करणाऱ्या टोळीपासून सावध राहण्याचे आवाहन कंपनीने केले आहे.