IPL 2026 – पंजाबचे तुफान आज हैदराबादलाही उडवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विजयाच्या रथावर स्वार झालेला पंजाब किंग्ज शनिवारी सनरायझर्स हैदराबादच्या आव्हानाला सामोरा जाणार आहे. सलग दोन सामने जिंकून आत्मविश्वास उंचावलेल्या पंजाबचे तुफान हैदराबादलाही उडवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. मात्र, संघर्ष करत असला तरी अभिषेक शर्माच्या रूपाने हैदराबादकडे धोकादायक अस्त्र आहे. घरच्या मैदानावर तो मोठी खेळी करत पंजाबचा विजयमार्ग रोखू शकतो.

श्रेयसच्या नेतृत्वाखाली पंजाबने यंदा विजेतेपदाचा दमदार दावा सादर केला आहे. मग तो चेन्नईविरुद्ध 200 धावांहून अधिक लक्ष्याचा सहज पाठलाग असो किंवा कठीण खेळपट्टीवर गुजरातला हरवण्याचा पराक्रम, पंजाबने आपली ताकद दाखवून दिली आहे. कोलकात्याविरुद्धही दमदार सुरुवात झाली होती, मात्र पावसामुळे सामना रद्द झाल्याने गुण वाटून घ्यावे लागले. संघाचा दृष्टिकोनही स्पष्ट आहे. यष्टिरक्षक-फलंदाज प्रभसिमरनने सांगितल्याप्रमाणे, वैयक्तिक विक्रमांपेक्षा संघाच्या यशावर भर दिला जात आहे. कूपर कोनोलीची नाबाद 72 धावांची खेळी आणि वैशाकच्या गोलंदाजीतील प्रभाव याच मानसिकतेचे उदाहरण ठरले आहे.

दुसरीकडे, हैदराबादचा डाव मात्र विस्कळीत दिसतोय. वरच्या फळीतील दमदार फलंदाज अपयशी ठरत असल्याने संघ अडचणीत सापडला आहे. हेड आणि अभिषेकची सलामी जोडी लवकर बाद होत असल्याने संघावर दबाव येतोय. गोलंदाजीत हर्षल आणि उनाडकट अपयशी ठरल्याने संकट अधिक गडद झाले आहे. तरीही नीतीश रेड्डी आणि हेन्रिक क्लासेन यांच्या कामगिरीतून हैदराबाद प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करेल. हर्ष दुबेने सुरुवातीच्या षटकांत छाप पाडली असली तरी उनाडकटला मागील अपयश भरून काढावे लागणार आहे.