
टळटळत्या उन्हात पेणवासीयांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पेण तालुक्यात अनेक भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून विहिरींनी तळ गाठल्याने पाणीबाणीची स्थिती आहे. त्यामुळे १७ वाड्यांना दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. मात्र हे पाणी अपुरे पडत असल्याने रात्री-अपरात्री नागरिकांना भांडीकुंडी घेऊन फरफट करावी लागत आहे.
रायगड जिल्ह्यात मुरुड, तळा, रोहा, पेण, अलिबाग तसेच सुधागडसह १३ तालुक्यात २८ धरणे बांधली गेली आहेत. या धरणातून जिल्ह्यात पाणीपुरवठा केला जातो. जिल्ह्यातील २८ धरणात ६८.२६१ दलघमी पाण्याच्या साठ्याची क्षमता आहे. यातील सात धरणांमध्ये ४० टक्क्यांहून कमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पेण तालुक्यातील १७ वाड्यांमध्ये पाणीबाणी निर्माण झाली असून येथील गावकऱ्यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या वाड्यांना दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. मात्र हे पाणी कमी पडत असल्याने नागरिकांना दोन-तीन किमी पायपीट करून पाणी आणावे लागत आहे.
– पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांसाठी ९ कोटी ३० लाख खर्चाचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे.
– आराखड्यानुसार टंचाईग्रस्त गावांना टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, तसेच पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विंधण विहिरी खोदण्यात येणार आहेत.
– उमटे धरणाचा पाणीसाठा खालावला असून या धरणावर अवलंबून असणाऱ्या गावांना एक ते दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
जलजीवन मिशनचा बोजवारा
‘हर घर नल से जल’ या योजनेंतर्गत जिल्ह्यात १ हजार ४२२ योजनांची कामे हाती घेण्यात आली असून ही कामे डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण न झाल्याने अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांना दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. मात्र त्यानंतरही जिल्ह्यातील ६०७योजनांची कामे अद्यापही अपूर्ण आहेत, त्यामुळे योजनेचा बोजवारा उडाला आहे.






























































