
लघुशंकेसाठी गेलेला तर्राट पर्यटक दरीत पडून जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. हरिश्चंद्र गोसावी असे जखमी झालेल्या पर्यटकाचे नाव असून ते मूळचा पुण्याचा आहे. गोसावी हा पुणे येथून मित्रांसोबत अलिबाग येथे पर्यटनासाठी आला होता. मात्र घरी परतत असताना पेणच्या कार्लेखिंड येथे सर्व मित्र लघुशंकेसाठी थांबले होते. दरम्यान त्याचा तोल जाऊन तो दरीत कोसळला.
हरिश्चंद्र गोसावी व त्याचे मित्र अलिबाग येथील पर्यटनस्थळे पाहून पुन्हा पुण्याला जाण्यासाठी निघाले. तेव्हा त्यांनी रस्त्यात दारूची पार्टी केली. दरम्यान लघुशंका करण्यासाठी गाडीतून उतरलेल्या तर्राट हरिश्चंद्रला अंदाज न आल्याने तो दरीत कोसळला. त्याच्या मित्रांनी स्थानिकांच्या मदतीने वाहतूक पोलिसांना पाचारण केले. यावेळी वाहतूक पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने तब्बल अर्धा तास अथक प्रयत्न करून हरिश्चंद्राला बाहेर काढले. या घटनेत हरिश्चंद्र जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी परहुर येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहे.