पेण नगरपालिकेच्या मिनी मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

“स्वच्छ पेण, सुंदर पेण” या ब्रीदवाक्यानुसार पेण नगरपालिकेने “एक दौड स्वास्थ्य के लिए” हे ब्रीदवाक्य घेऊन मिनी मॅरेथॉन आयोजित केली होती. या स्पर्धेत शाळेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, महिला तसेच तरुणाईने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. एकूण दहा गटात झालेल्या या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत एकूण 1664 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.

या वेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, पेणच्या नगराध्यक्षा प्रितम पाटील , उपनगराध्यक्षा वैशाली कडू, गटनेते अनिरुद्ध पाटील, मुख्याधिकारी अर्चना दिवे, भास्कर पाटील, दर्शन बाफणा, डॉ.सागर ओक, किरण म्हात्रे, अशोक जैन, पालिकेचे सर्व सभापती, नगरसेवकांनी उपस्थित होते. या स्पर्धेत रोटरी क्लब व महिला बचत गटांनी सहभाग घेतला होता. 50 वर्षावरील पुरुष वयोगटात चंद्रकांत पाटील यांनी तर महिला वयोगटात संध्या कडू यांनी प्रथम पारितोषिक पटकावले. 21 वर्षांवरील वयोगटात किरण माळी व ऋतुजा सकपाळ यांनी प्रथम पारितोषिक मिळवले. 18 ते 20 वयोगटातील मुलांमध्ये शुभम मडवी यांनी तर मुलींमध्ये स्वप्नाली म्हात्रे हिने प्रथम क्रमांक पटकावला. 15 ते 17 वयोगटात मिलिंद निरगुडे व मुलींमध्ये प्रतिक्षा कुलये हिने प्रथम पारितोषिक पटकाविले. लहान मुलांच्या 12 ते 14 वयोगटातील महेंद्र पारधी व मयुरी चव्हाण हे प्रथम आले आहेत. मिनी मॅरेथॉन स्पर्धेतील सर्व विजयी स्पर्धकांना आमदार प्रशांत ठाकूर, नगराध्यक्षा प्रितम पाटील, मुख्याधिकारी अर्चना दिवे यांच्याहस्ते रोख पारितोषिक, पदक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.