
सामना प्रतिनिधी। पेण
देशभरात सुरू असणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या दोन दिवसीय संपाला पेणमध्ये देखील चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असून या संपामुळे कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. नॅशनल फेडरेशन पोस्टल एम्प्लॉयी युनियनचे राष्ट्रीय नेते टी. एन. रहाटे आणि सर्कल सेक्रेटरी सुनिल झुंजारराव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रायगड जिल्ह्याचे विनोद जाधव, संजय जाधव, संजय पालकर, तुषार पवार यांच्या नेतृत्वाखाली पेणमध्ये हे संप पुकारण्यात आले होते या संपामध्ये शोभा म्हात्रे, तुषार पवार,शोभना बामणे, व्ही एन पाटील,अनिल मांडलेकर, माया प्रकाश बावकर आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या संपामुळे त्रस्त नागरिकांनी आपला चांगलाच संताप व्यक्त केला.
नवीन पेन्शन योजना जुनी पेन्शन योजना लागू करा,किमान वेतन व फिटमेंट फॉर्म्युला पुनर्गठित करा, खाजगीकरण व कंत्राटीकरण बंद करा, पाच दिवसांचा आठवडा लागू करा आदी मागण्या घेऊन हे कर्मचारी संपावर गेले आहेत. विशेष म्हणजे पोस्ट मास्तर मोरेश्वर पाटील यांना या आधीच आंदोलनाची पूर्वसूचना देऊनही त्यांनी ग्राहकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून कोणत्याही प्रकारची तजवीज केलेली पाहायला मिळाली नाही. त्याचाच एक भाग म्हणजे पेण पोस्ट कार्यालयात ग्राहकांसाठी एकूण सहा खिडक्या खुल्या आहेत. त्यापैकी संपामध्ये फक्त एकाच खिडकीसमोरील कर्मचारी सहभागी झालेला असल्याने कार्यालयातील सहाच्या सहा खिडक्या बंद ठेवण्यात आल्याने जेष्ठ नागरिकांसह सर्वांचेच हाल या बेजबाबदारपणामुळे झाल्याचे पाहायला मिळाले.

































































