पेण अर्बन बँक घोटाळा प्रकरण,बेनामी कर्ज घेऊन 131 एकर जमीन विकत घेतली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पेण

पेण अर्बन बँक घोटाळय़ातील आरोपींचे रोज नवे कारनामे समोर येत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी पुन्हा कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केली असून एका दाम्पत्याला बेडय़ा ठोकल्या आहेत. या नवरा-बायकोने बनावट कागदपत्राद्वारे बेनामी कर्ज घेऊन 131 एकर जमीन विकत घेतल्याचे उघड झाले आहे. या कारवाईने घोटाळेबाजांना आणखी जोरदार दणका बसला आहे.

पेण अर्बन बँकेचे मुख्य आरोपी शिशिर धारकर, प्रेमकुमार शर्मा व इतर आरोपींनी मिळून बॅंकेत सुमारे 758 कोटींचा घोटाळा केला आहे. त्यापैकी 598 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने विशेष कृती समितीला दिले आहेत. या आरोपींनी बनावट कागदपत्राद्वारे शैलेश देशपांडे व प्रज्ञा देशपांडे यांच्यासह इतरांच्या नावे विविध ठिकाणी सुमारे 131 एकर जमीन खरेदी केली होती. यामध्ये देशपांडे याच्या नावाने रोहासह पनवेल तालुक्यातील आकुर्ली, विचुंबे, नेरे येथे 33 एकर जमीन तर प्रज्ञा देशपांडे हिच्या नावे सुधागड तालुक्यातील पालीनजीक घेरा या गावी 6 एकर जमीन खरेदी केली होती. या जमिनीची किंमत सुमारे 100 कोटी असल्याचे बोलले जाते.

– घोटाळाप्रकरणी बँकचे माजी अध्यक्ष शिशिर धारकर व तत्कालीन संचालक प्रेमकुमार शर्मा यांना सक्त वसुली संचालनालयाकडून बँकेच्या रकमेची मनी लॅण्डरिंग केल्याच्या आरोपाखाली नुकतीच अटक झाली आहे.
– 2001 – 2010 या दशकात 685 बनावट कर्ज खाती उघडून 774 कोटी रुपये कर्ज दिल्याचे दाखवण्यात आले. नंतर ही कर्ज खाती बुडीत दाखवून बंद करण्यात आली.

128 बोगस कर्जदारांवरही कारवाई करा!
अटक सत्रावर संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव यांनी समाधान व्यक्त केले. बॅंकेचे शेकडो कोटींची कर्ज वाटप करणाऱया तत्कालीन हायपावर कमेटीचे पदाधिकारी व कथित 128 बोगस कर्जदारांवरही तातडीने कारवाई करावी व मालमत्ता खरेदी व्यतिरिक्त अपहारीत करण्यात आलेली सुमारे 600 कोटींची रोख रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्याची मागणी केली आहे.