मुदत संपल्यानंतरही आयकर भरण्यासाठी ‘हे’ आहेत पर्याय, पण…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

शुक्रवार ३१ ऑगस्ट हा आयकर भरण्यासाठीचा शेवटचा दिवस आहे. केंद्र सरकारने ३१ जुलै पर्यंत मुदत दिली होती, पण नंतर ती ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली. अनेक नोकरदार, व्यावसायिक यांनी अद्यापही आयकर भरलेला नाही.  आणि शेवटच्या दिवशी प्रत्येकाचा अर्ज भरला जाईलच याची शाश्वती नाही. म्हणून सरकारने उशिरा अर्ज करणार्‍यांसाठीही काही पर्याय उपलब्ध केले आहेत.

दंड भरून आयकर जमा करा

आयकर कायद्यात केंद्र सरकारने 234F हे नवे कलम समाविष्ट केले आहे. या कलमानुसार १० हजार रुपयापर्यंत दंड भरून मुदतीच्या शेवटच्या तारखेनंतर आयकर भरण्याची मुभा देण्यात आली आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षातील कर भरण्यासाठी १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज केल्यास ५ हजारपर्यंत दंड भरून अर्ज करता येईल. एक जानेवारीनंतर अर्ज केल्यास १० हजार रुपये दंडाची तरतूद आहे. जर आयकर भरणार्‍या अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे पाच लाख रुपयांहून कमी असेल तर अर्जदाराला एक हजार रुपयांहून कमी दंड बसेल.

अर्ज दुरुस्ती

आयकर भरतेवेळी केलेल्या अर्जात चुकीची माहिती नमूद केल्यास ती दुरुस्त करता येते. त्यासाठी revised return असा पर्याय असतो. त्यातून तुम्ही आपल्या अर्जात हवे ते बदल करू शकता.