असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना मिळणार पेन्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना दिलासा देणारी बातमी आहे. मासिक १५ हजारापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व असंघटीत कामगारांना पेन्शन योजना राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. १८ ते ४० वयोगटातील सर्व असंघटीत कामगारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ५ मार्च पासून देशभरात सुरु होणाऱ्या या योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी केले आहे.

ते अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या योजनेचा लाभ घरकामगार, दुकानांमध्ये काम करणारे कामगार, शेतमजुर, वीटभट्टी कामगार, कंत्राटी पध्दतीने शासकीय अस्थापनांमध्ये काम कऱणारे कर्मचारी, अंगणवाडी सेविका मदतनीस, रिक्षा चालक यासारख्या असंघटीत कामगारांना होऊ शकणार आहे. ज्यांचे उत्पन्न मासिक १५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. ज्यांना शासकीय अथवा निमशासकीय पेन्शन योजना लागू नाही अशा कामगारांचा यात प्रमुख्याने सहभाग असणार आहे. एलआय़सीच्या माध्यमातून हि योजना देशभरात राबविली जाणार असून, बँक खात्याची माहिती आधार कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला हि तीनचा कागदपत्र यासाठी आवश्यक असणार आहेत. १८ ते ४० वयोगटातील असंघटीत कामगारांना मासिक वयोमानानुसार ५५ ते २०० रुपयांचा मासिक हप्ता भरवा लागणार आहे. त्यामोबदल्यात त्यांना वयाच्या ६० वर्षानंतर ३ हजार रुपये प्रतीमहा याप्रमाणे पेन्शन मिळवता येणार आहे.

महिला बचत गट सदस्य, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि त्यांच्या मदतनीस या सर्वांना या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. जिल्ह्यातील ५३१ ग्राहक सुविधा केंद्र आणि २०० खाजगी ग्राहक सेवा केंद्रांवर या योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करता येणार आहे. जास्तित जास्त असंघटीत कामगारांनी या योजनेसाठी नोंदणी करून लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी यावेळी केले.