खणखणीत ‘ठाकरे’ झणझणीत ‘शिववडा’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. ट्रेलर लॉन्चनंतर हा चित्रपट खणखणीतच असणार यावर जाणकारांचे एकमत झालेले असताना आता खणखणीत ‘ठाकरे’सोबत मराठमोळा झणझणीत ‘शिववडा’ही मिळणार आहे. कार्निव्हल सिनेमाच्या 72 चित्रपटगृहांमध्ये तसा मेन्यूही तयार झाला आहे.

मराठी खाद्यपदार्थांमध्ये ‘वडा-पाव’ला एक विशेष स्थान आहे. आणि त्यात ‘शिववडा’ हा नंबर वन मानला जातो. म्हणूनच ‘ठाकरे’ सिनेमा पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांनी पॉपकॉर्न न चघळता ‘शिववडा’ची चव अनुभवावी, असा विचार कार्निव्हल सिनेमाने केला आणि आपल्या मेन्यूत त्याला स्थानही दिले. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यातही स्टार्टर म्हणून शिववड्याचा आस्वाद उपस्थितांनी घेतला होता.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत प्रस्तुत, राऊटर्स एंटरटेनमेंट एलएलपी, वायकॉम 18 मोशन पिक्चर्स आणि कार्निव्हल मोशन पिक्सर्च निर्मित ‘ठाकरे’ हा सिनेमा येत्या 25 जानेवारी रोजी देशभर प्रदर्शित होणार आहे.

12 जानेवारीला म्युझिक लॉन्च
या सिनेमाचे धमाकेदार म्युझिक लॉन्च येत्या शनिवारी 12 जानेवारीला मुंबईत एका शानदार सोहळ्यात केले जाणार आहे. या चित्रपटाला आजचे आघाडीचे संगीतकार रोहन-रोहन यांनी संगीत दिले असून व्हेंटिलेटर, बकेट लिस्ट, संजू या चित्रपटांतील गाण्यांना त्यांनीच स्वरसाज दिला होता. ‘ठाकरे’चे संगीत तरुणाईच्या हृदयाचा ठाव घेणारे असेल, असे त्यांनी सांगितले. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांतील गाण्यांचे लॉन्चिंग 12 तारखेला होणार असून हिंदी गाणे सुखविंदर सिंग यांनी तर मराठीतील गाणे अवधूत गुप्ते यांनी गायले आहे.