मुंबईत तेज मशालीचेच! उद्धव ठाकरेंना कौल; मराठी जनतेने गद्दारांची मस्ती उतरवली

मुंबई ही शिवसेनेचीच आहे याची जाणीव आजच्या निवडणूक निकालाने भारतीय जनता पक्षाला करून दिली. प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबईत रोड शो केला. शिवाजी पार्कवर सभा घेतली. त्यानंतरही मुंबईत शिवसेनेच्या मशालीचेच तेज दिसून आले. मुंबईकरांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच कौल दिला. अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दिना पाटील या शिवसेनेच्या शिलेदारांचा दणदणीत विजय झाला.

यंदाच्या निवडणुकीत भाजपचा महाराष्ट्रावर विशेषकरून मुंबईवर डोळा होता. शिवसेना संपवण्याच्या वल्गना भाजप नेते करत होते. त्यासाठी त्यांना मुंबई जिंकायची होती, पण त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले. निवडणुकीच्या प्रचारकाळात पंतप्रधान मोदी दोन वेळा मुंबईत येऊन गेले. महाराष्ट्राच्या अन्य भागातही जाऊन त्यांनी दबाव बनवण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली असल्याची टीका केली, परंतु ते यशस्वी झाले नाहीत. मुंबईकरांनी शिवसेनेवर मतांचा पाऊस पाडून ‘असली तो असली होता है’ हे भाजपला दाखवून दिले. मोदींनी रोड शो केला त्या ईशान्य मुंबईतील भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांना शिवसेनेच्या संजय पाटील यांनी धूळ चारली.

शिवाजी पार्कवर मोदींसोबत व्यासपीठावर बसलेले विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना दक्षिण-मध्य मुंबईत पहिल्यांदाच उभ्या राहिलेल्या शिवसेनेच्या अनिल देसाई यांनी पराभूत केले. दुसऱया उमेदवार यामिनी जाधव यांचा दक्षिण मुंबईत अरविंद सावंत यांच्यासमोर टिकाव लागला नाही.

उत्तर-पश्चिम मुंबईतही शिवसेनेच्या अमोल कीर्तिकर यांनी महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांना अक्षरशः घाम फोडला.

मुंबईत शिवसेनेने चांगली कामगिरी केल्यानंतर शिवसैनिकांबरोबरच तमाम मुंबईकरांमध्येही आनंद व्यक्त होत आहे. शिवसेनेचे उमेदवार विजयी होताच अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोलताशांचा गजर केला. त्यावेळी ‘मुंबई आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची’ अशा घोषणा देत हिंदुहृदयम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याही आठवणींना उजाळा दिला गेला.

भाजप 9 जागांवर अडकला; महायुतीला 23 जागांचा फटका

भाजप, मिंधे आणि अजित पवार गटाच्या महायुतीला 23 जागांचा फटका बसला. महाविकास आघाडीच्या लाटेत या तिघांचीही दाणादाण उडाली. भाजपची 9 जागांपर्यंत खाली घसरला तर अजित पवार गटाला फक्त 1 जागा मिळवता आली.