
सामना प्रतिनिधी । हडोळती
पीकाचे योग्यरित्या नियोजन, योग्यवेळी फवारणी व योग्यवेळी पिकाची रोगराई पासून मुक्तता केल्यास कोणत्याही अस्मानी संकटात चांगले उत्पादन मिळू शकते याचाच प्रत्यय हडोळती येथे पहायला मिळत आहे. हडोळती येथील शेतकरी दत्ता प्रभाकर हेंगणे यांनी एक एकरमधील पहील्याच तोडणीला २० हजाराचे उत्पन्न मिळवले आहे.
हडोळती व परिसरामध्ये शेतकरी भाजीपाला लागवडीमध्ये अग्रेसर असतात. गेल्यावर्षी टोमॅटोला बाजारभाव मिळाला नाही व टोमॅटोचा चिखल झाला म्हणून दत्ता हेंगणे यांनी एक एकर मध्ये चाकूर येथील नर्सरी मधून अंकुर जातीचे रोपे आणली व मे महीन्यामध्ये मिरचीची लागवड केली. प्रथम जमीन भुसभुशीत केली व सऱ्या पाडण्यासाठी ३००० रुपये खर्च केले, सऱ्या ओढण्यासाठी ८०० रुपये, मल्चींगसाठी २००० रुपये, मजुरीसाठी २०००, ड्रीप मधून खतासाठी ६००० रुपये खर्च करून त्याची माल्चींग पेपरला छिद्र पाडून लागवड केली. लागवडीचा वेळेस डॅप एक पोते, पोटॅश सल्फर १० किलो उन्हाळ्यात ठिबक मधून एक विहीरीच्या माध्यमातून मिरचीला पाणी दिले. काटकसरीने खर्च करून जैविक ब्लेचिक करण्यासाठी देशी गायीचे गोमुत्र १० लीटर, खराब गुळ २ किलो, बेसणपीठ २ किलो, वडाच्या झाडाखालील माती, १० लिटर ताक पंधरा दिवसाला एका ड्रम मध्ये कालवून एका रोपास १०० मि.मि. टाकले व ४ महिन्यानंतर पहिली तोड चालू झाली असून पहील्या तोडालाच २० ते २५ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे. ६० रुपये किलो दराने मिरची ठोक दराने व्यापारी घेऊन जात आहेत.
भाव स्थिर राहीला तर हा फड सहा ते आठ महीने चालतो. यामधून दीड लाखाचे उत्पन्न मिळेल असे दत्ता हेंगणे यांनी सामनाशी बोलताना सांगितले. शेतीच्या माध्यमातून अत्यंत चांगले प्रयोग करून घेता येतात. कमी पाण्यावर कमी क्षेत्रात जास्तीचे उत्पन्न कसे घेता येते हे दाखवून दिले आहे व दत्ता हेंगणे यांनी एक एकरमध्ये टोमॅटोची लागवड केली असून टोमॅटोचे उत्पादन अपेक्षीत आहे असे सांगितले.
































































