
सामना ऑनलाईन, मुंबई
आपल्या दोन मित्रांसह विहार तलावावर वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेली ५२ वर्षीय बेपत्ता झाली आहे. संभाजी कुळ्ये असं या व्यक्तीचे नाव असून त्यांचा शोध घेण्याचे काम रविवारपासून सुरू आहे. कुळ्ये हे पवई येथील बिस्कीट कंपनीत कामाला आहेत. रविवारी कामावरून ते थेट या तलावावर गेले होते आणि तिथूनच ते बेपत्ता झाल्याचं सांगण्यात येत आहे.
संभाजी कुळ्ये यांच्या मुलाला रविवारी संध्याकाळी सहा वाजता ते बेपत्ता झाले असून तुम्ही तातडीने विहार तलावापाशी या असा निरोप देण्यात आला. तिथे पोहोचल्यानंतर संभाजी यांच्यासोबत तलावावर गेलेल्या मित्रांनी सांगितलं की ते काही कराणासाठी तलावाच्याभोवती असलेल्या झुडुपांमध्ये गेले आणि त्यानंतर ते परत आलेच नाहीत. पोलिसांना संशय आहे की संभाजी हे झुडुपात गेले असताना त्यांचा पाय घसरला असावा आणि ते पाण्यात बुडाले असावेत. चिंतेची बाब ही आहे की या तलावामध्ये मगरींचं वास्तव्य आहे, त्यामुळे संभाजी यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. रविवार आणि सोमवार असे दोन दिवस शोध घेतल्यानंतरही संभाजी यांचा शोध लागू शकलेला नाही. मंगळवारी पुन्हा एकदा ही शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.























































