
सरकारमार्फत पुनर्विकास करण्यात येणार्या बीडीडी चाळींचा प्रकल्प अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. बांधण्यात येणार्या दोन इमारतींमधील अंतर कमी असणार असल्यामुळे घरात सूर्यप्रकाश पोहोचणार नाही, हवाही खेळती राहणार नाही असा दावा करत बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
वरळी, नायगाव, ना. म. जोशी मार्ग (डिलाईल रोड) तसेच शिवडी येथे 100 वर्षांपूर्वी बीडीडी चाळी बांधण्यात आल्या आहेत. या बीडीडी चाळी मोडकळीस आल्याने शासनामार्फत त्यांचा पुनर्विकास केला जाणार आहे. परंतु लहान जागेत जास्तीत जास्त इमारती बांधण्यात येणार असल्याने सूर्यप्रकाश तसेच हवा खेळती राहणार नसल्यामुळे आजार बळावणार आहेत, असा आरोप करत शिरीष पटेल आणि सुलक्षणा महाजन यांच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

























































