
कमळ हे धार्मिक प्रतिक असताना भाजप त्याचा पक्षचिन्ह म्हणून उपयोग करत असल्याला आक्षेप घेणारी आव्हान याचिका मद्रास हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. तमिळनाडूतील अहिंसा सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक टी रमेश यांनी ही याचिका दाखल केली आहे. कमळ हे हिंदुस्थानचे राष्ट्रीय फूल असताना ते पक्षनिशाणी म्हणून कुठल्याही राजकीय पक्षाला देता येणार नाही. आणि असे चिन्हवाटप हे राष्ट्रीय एकात्मतेसाठी लाजीरवाणे असल्याचा दावा रमेश यांनी याचिकेत केला आहे. कमळ हे धार्मिक तसेच राष्ट्रीय प्रतिकही आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह म्हणून ते भाजपला देऊन आपल्याच नियमांचा भंग केला आहे, असा युक्तीवाद शुक्रवारी त्यांनी केला.




























































