कारशेडसाठी आरेतील वृक्षांची कत्तल थांबवा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
save-aarey-movement

सामना ऑनलाईन, मुंबई

‘मेट्रो’च्या कारशेडसाठी मुंबईतील फुफ्फुसे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरे कॉलनीतील असंख्य झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात येणार आहे. वृक्ष प्राधिकरण समितीने ही झाडे तोडण्याची परवानगी दिलेली नसतानाही या झाडांची मेट्रो प्रशासनाकडून कत्तल केली जाणार आहे. त्यामुळे आरेतील बेसुमार वृक्षांची तोड त्वरित थांबवा अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या खंडपीठासमोर 3 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

 वृक्ष प्राधिकरणाने याविषयी नागरिकांच्या सूचना आणि तक्रारी मागविल्या असून त्यावर 10 ऑक्टोबरला जनसुनावणी होणार आहे. असे असतानाही मेट्रोच्या कारशेडकरिता शेकडो झाडे तोडण्याचे काम मेट्रोने हाती घेतले आहे. त्यामुळे या वृक्षतोडीविरोधात स्थानिकांसह अनेक पर्यावरणवादी संस्थांनी आक्षेप घेतला असून प्रीती शर्मा आणि रुबेन मस्कारेन्हास यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मेट्रोने झाडे तोडण्याचे काम थांबवावे अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी होणार आहे.