
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
अयोध्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने 2010 सालात दिलेल्या एका निकालाविरोधातील आव्हान अर्जावरील सुनावणी सर्वसाधारण खंडपीठासमोर की पाच सदस्यांच्या घटनापीठासमोर घ्यायची याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय उद्या घेणार आहे.
यासंदर्भातील निकाल सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती अब्दुल नझीर यांच्या खंडपीठाने 20 जुलै रोजी राखून ठेवला होता. मशिदीत नमाज पढणे इस्लामचा अविभाज्य भाग आहे किंवा नाही आणि अयोध्येतील जमीन खरी कोणाची, याचा फैसला त्या सुनावणीत होणार आहे.
अयोध्येतील जमिनीचे वाटप रामलल्ला विराजमान, निर्मोही आखाडा आणि मुस्लिम यांच्यात तीन हिश्शात करावे, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने 2010 सालात दिला होता. 1994 सालात इस्माईल फारुकी प्रकरणात मशिदीत नमाज पढणे हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल दोन्ही पक्षकारांनी अमान्य केला होता. 1994 सालातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मुस्लिमांना अमान्य आहे.




























































