
फलटणमध्ये महिला डॉक्टर बलात्कार, आत्महत्या प्रकरणातील दोषींवर तातडीने कारवाई करा, अशी मागणी करीत आज मुंबईसह राज्यभरातील सर्व शासकीय रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी ‘काम बंद’ आंदोलन केले. या आंदोलनाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिले नाही तर ‘नॉन इमर्जन्सी’ सुविधाही बंद करण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. दरम्यान, आज डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठी गैरसोय झाली. वैद्यकीय अधिकाऱयांनी ‘ओपीडी’चे काम सांभाळल्याने दूरवरून आलेल्या रुग्णांना काहीसा दिलासा मिळाला.
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा यांनी 24 ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली. त्यांनी हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पोलीस अधिकाऱयांनी बलात्कार आणि मानसिक छळ केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाचा राज्यभरातील डॉक्टरांकडून निषेध करण्यात येत आहे. या घटनेला जबाबदार असणाऱया सर्वांचा शोध घेऊन लवकरात लवकर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करीत आज सेंट्रल महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) आणि पालिका मार्ड यांनी अनिश्चित काळासाठी ‘काम बंद’ आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.
…तर राज्यभरात आरोग्य सेवा कोलमडणार
सोमवारी केईएम, शीव, नायर आणि कूपर रुग्णालयासह राज्यभरातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालये, जेजे वैद्यकीय महाविद्यालय आणि इतर सरकारी वैद्यकीय रुग्णालयांच्या परिसरात मूक निदर्शने आणि रॅली काढण्यात आल्या. तर दोषींवर तातडीने कारवाई करेपर्यंत ‘काम बंद’ आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला. हीच स्थिती कायम राहिल्यास उद्यापासून मुंबईसह राज्यभरातील शासकीय आरोग्य सेवा कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे.
‘एसआयटी’ चौकशी करा, पीडित कुटुंबाला पाच कोटींची भरपाई द्या
या प्रकरणाची विशेष तपास पथक (एसआयटी)कडून चौकशी करा आणि पीडित डॉक्टरच्या कुटुंबाला पाच कोटींची नुकसानभरपाई द्या, अशी मागणी ‘मार्ड’च्या वतीने पालिका अध्यक्ष डॉ. चिन्मय केळकर यांनी केली आहे.
शिवाय सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी तक्रार निवारण आणि मानसिक आरोग्य सहाय्य प्रणाली स्थापन करण्याची मागणी निवासी डॉक्टरांकडून करण्यात आली आहे. या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे.
            
		





































    
    



















