फोटोच्या गोष्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धनेश पाटील ,[email protected]

मालिका, चित्रपटांतील व्रतस्थ लेखणी

मालिका–चित्रपटांसाठी सोळा वर्षे सातत्याने लिखाण करणारे शिरीष लाटकर… एक शांत आणि विचारी व्यक्तिमत्त्व आहे…
सुमारे पंचेचाळीसहून अधिक नाटकं, अनेक मराठी-हिंदी सिनेमे, तीसहून अधिक मालिकांसाठी सुमारे बारा हजारहून अधिक भाग… या साऱयांसाठी सातत्याने सोळा वर्षे लेखन करणारे शिरीष लाटकर हे ग्लॅमर इंडस्ट्रीतलं अदबीनं घेतलं जाणारं नाव. महाविद्यालयीन काळात लिखाणाने गोडी लावलेल्या शिरीषच्या लिखाणाचा प्रवास हा एकांकिकांपासून सुरू झाला खरा. मात्र या लिखाणाला वेगळी गती देत आजवर अनेक मराठी-हिंदी सिनेमे, मालिका आणि नाटक असा वेगाने आणि सातत्यपूर्ण सुरू ठेवण्यात शिरीषला यश आलं आहे. विविध विषय अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात शिरीषचा हातखंडा असून कथा, संवाद आणि पटकथा अशा तिहेरी भूमिकेत शिरीष लीलया वावरतो. शिरीषच्या याच लिखाणाच्या योगदानामूळे त्याला मालिका क्षेत्रात व्यासमुनी या नावाने ओळखले जाते, ही सर्वसामान्यांना माहीत नसलेली त्याची वेगळी ओळख.

चंदेरी आणि रुपेरी पडद्यावर गेली अनेक वर्षे सातत्याने लिखाण करणाऱया शिरीषला लिखाणाने गोडी लावली ती महाविद्यालयीन काळात आणि याच काळात त्याने एकांकिकांसाठीचं लिखाण त्याने सुरू केलं. शिरीषच्या लिखाणाचा श्रीगणेशा छोटय़ा पडद्यावर झाला तो सह्याद्री वाहिनीच्या ‘उतावळे नवरे’ या सहा एपिसोड्सच्या मालिकेपासून. त्यानंतर ‘कुंकू टिकली’ ही मालिका शिरीषने लिहिली. यानंतर सह्याद्रीसाठी ‘सोंगटी’ ही मालिका, ‘भाग्यविधाता’ (300 एपिसोड्स), ‘या सुखांनो या (850 एपिसोड्स)’, ‘वहिनीसाहेब (750 एपिसोड्स), ‘स्वप्नांच्या पलिकडले (1100 एपिसोड्स) तसच ‘ललित 205’, ‘उतावळे नवरे’, ‘त्यांच्या मार्गावर’, ‘साईबाबा’, ‘हसण्यासाठी जन्म आपला’, ‘श्री स्वामी समर्थ’, ‘वहिनी साहेब’, ‘घर श्रीमंतांचे’, ‘ब्रम्हांडनायक’ आणि अशा अनेक गाजलेल्या मालिकांसाठी शिरीषने कथा, पटकथा आणि संवाद लेखनाचं काम केलं. मराठी मालिकांचा अनुभव पाठीशी असलेल्या शिरीषला 2009 मध्ये एकता कपूरच्या बालाजी टेलीफिल्म्ससाठी ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका लिहिण्याची संधी चालून आली. या मालिकेचे तब्बल 1424 एपिसोड्स शिरीषने बघता बघता लिहिले. त्यानंतर ‘बडे अच्छे लगते है’ (250 एपिसोड्स), ‘इस प्यार को…’ (540 एपिसोड्स) या मालिकेचा दुसरा सीझन अशा एकूण सात मालिका त्यांनी ‘बालाजी’साठी लिहिल्या. याखेरीज ‘बैरी पिया’, ‘तेरे लिये’, ‘लाखों मे एक’, ‘संस्कार’ यासारख्या गाजलेल्या मालिकांचं लिखाण केलं. मालिकांसाठी सातत्याने लिखाण करताना त्यातली भावनिक गुंतागुंत समजून उमजून ते प्रेक्षकांसमोर मांडण्याचं मोठं आव्हान लेखकासमोर असतं आणि हे आव्हान शिरीषने आजवर अनेक वर्षे लीलया पेललंय. प्रेक्षकांना कुठेही कंटाळा न वाटता उलट त्या मालिकेच्या पुढच्या भागाची आतुरता सातत्याने लावून धरण्यात शिरीषच्या लेखणीला आजवर यश आलं आहे.

यशाचा, प्रगतीचा हाच आलेख कायम चढता ठेवत मराठी आणि हिंदी मालिकांखेरीज शिरीषने आजवर अनेक नाटकांसाठी देखील लिखाण केलं. मराठी नाटकांमध्ये ‘अनधिकृत’, ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’, ‘कोण – कुणासाठी ?’, ‘नाते एका शब्दांचे’, ‘मिस्टर अँड मिसेस 36’ यासारख्या नाटकांचं लिखाण त्याने केलं. तर मराठी सिनेमांपैकी ‘भीती – एक सत्य’, ‘अधांतरी’, ‘सुवासिणीची ही सत्त्वपरीक्षा’, ‘गोजिरी’, ‘मिशन इम्पॉसिबल’, ‘तुला कळणार नाही’, ‘लाल इष्क’, ‘बायोस्कोप’, ‘मितवा’ तर हिंदी सिनेमांपैकी ‘मालिक एक’, ‘इट् टू मच’, ‘गुलिस्ता’ या सिनेमांचं लेखन त्याने केलं. शिरीषने लिहलेले ‘माधुरी’ (कथा, पटकथा, संवाद), ‘रणांगण’ (पटकथा, संवाद), ‘सविता दामोदर परांजपे’ (पटकथा, संवाद) हे यावर्षी प्रदर्शित झालेले यशस्वी सिनेमे. शिरीषच्या आजवरच्या या लिखाणाचं कौतुक अनेक स्तरातून झालं असून त्याच्या या लिखाणाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलं आहे. साहित्य संघाचा ‘नाटय़ सेवा गौरव पुरस्कार’ (2007 -2008), ‘पी. सावळाराम पुरस्कार’ (2006 – 2007), ‘राष्ट्रीय रत्न पुरस्कार’ (2004 – 2005), ‘शिक्षण मित्र पुरस्कार’ (2009 -2010) हे यातील काही मानाचे पुरस्कार.

साहित्याच्या क्षेत्रात मौल्यवान कामगिरी बजावलेल्या वैचारिक लेखकाचं मला या वेळी छायाचित्र टिपायचं होतं. हे छायाचित्र नेहमीपेक्षा वेगळं होतं. सिनेमात दिसणारे अभिनेते, अभिनेत्री यांचं ग्लॅमरस फोटोशूट नेहमीच होत असतात. मात्र एक कलाकाराची व्यक्तिरेखेचा अचूक अंदाज बांधून ती हुबेहूब कागदावर उतरवणाऱया पडद्यामागच्या या लेखकाचं फोटोशूट मला करायचं होतं. या फोटोला ग्लॅमर हे त्यांच्या कपडय़ांतून, रंगभूषेतून वा केशभूषेतून न दाखवता त्यांच्या कल्पकतेतून दाखवण्याचं वेगळं चॅलेंज जणू माझ्यासमोर होतं. शिरीषने आजवर अनेक नाटक, सिनेमे, मालिका या जन्माला घातल्या असल्याने त्याची एक विचारी, शांत अशी प्रतिमा सर्वसामान्यांपुढे होती. तिच प्रतिमा मला टिपायची होती. याशिवाय शिरीषचा हसरा, गोड, मनमिळाऊ स्वभाव, चारचौघात सहज मिसळणारा स्वभाव हादेखील मला प्रतिबिंबित करायचा होता. या साऱयाचा विचार करून शिरीषचं कृष्णधवल छायाचित्र टिपायचं असं मी ठरवलं. अर्थात त्यांच्या स्वभावात असलेला सौम्यपणा त्यांच्या चेहऱयावरती पाहायला मिळाला आणि मला हवे असलेले छायाचित्र अवघ्या काही क्षणात मला टिपता आलं.