पिंपरखेडला बिबट्या जेरबंद , नागरिकांत दहशत मात्र कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरूरच्या पश्चिमेकडील टोकास असणाऱ्या पिंपरखेडच्या साईनगर येथे शिरूर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात शनिवारी रात्री बिबट्या अडकला असून जांबूत व पिंपरखेड या बिबट्याने हल्ला केलेल्या घटनास्थळी लावलेले चार पिंजरे अजूनही बिबट्याच्या प्रतिक्षेत असल्याने नरभक्षक बिबटे जेरबंद कधी होणार ? असा प्रश्न भयग्रस्त नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

पिंपरखेड येथील साईनगर येथे गेले काही दिवसांपासून एक मोठा बिबट्या व दोन पिल्ले भक्ष्याच्या शोधात नागरिकांच्या घरासमोर,जनावरांच्या गोठ्यावर वावरत होते. त्यामुळे येथील ग्रामस्थ भयभीत झाले होते.बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी विक्रम पोखरकर यांनी केली होती. वनविभागाने या मागणीची तत्काळ दखल घेत या ठिकाणी लगेचच पिंजरा लावला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या पिंजऱ्यात गेले दोन दिवस भक्ष्य ठेवले जात होते.शनिवारी सायंकाळी भक्ष्य ठेवल्यानंतर एक तासाच्या आतच भक्ष्याची शिकार करण्याच्या नादात एक नर बिबट्या अलगद पिंजऱ्यात अडकला.

स्थानिक ग्रामस्थांनी पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनपाल गणेश पवार,वनरक्षक विशाल चव्हाण, वनरक्षक दहातोंडे,महेंद्र दाते लगेचच घटनास्थळी दाखल झाले.पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या दीड ते दोन वर्षे वयाचा असून त्याला शनिवारी रात्री माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात दाखल करण्यात आले आहे.अशी माहिती वनविभागाचे वनपाल गणेश पवार यांनी दिली.एक बिबट्या अडकला असला तरी अजून दोन बिबटे या परिसरात असल्याने वनविभागाने या ठिकाणी पुन्हा पिंजरा लावावा अशी मागणी विशाल दरेकर,रविंद्र पोखरकर,संतोष दाभाडे यांनी केली आहे.

शनिवारी 3 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान गणपती आरतीसाठी सहकुटुंब चारचाकी वाहनातून निघालेले कवठे येमाईच्या रोहिलवाडीतील संदीप तुकाराम रोहिले यांना रामदास पवार यांच्या जनावरांच्या गोठ्या जवळ चक्क 6 बिबट्यांचे रस्त्यावरच दर्शन झाले. त्यात 3 मोठे वाढ झालेले व 3 मध्यम वाढ झालेले बिबटे असल्याचे संदीप यांनी सांगितले.जवळच ऊस शेती असल्याने व मोकळ्या शेतात तरकारी,पालेभाजी,गवार भेंडी केलेल्या शेतकऱ्यांचा हाताशी आलेला माल तोडण्यास बिबट्यांच्या प्रचंड दहशतीने महिला वर्ग शेतात जाण्यास भीत असल्याचे शेतकरी विलासराव रोहिले यांनी सांगितले. तर या भागात वन विभागाने अधिकाधिक पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी रामदास पवार,विलासराव रोहिले,खंडू पवार,रामदास कांदळकर यांनी केली आहे.