वडापाव पाठोपाठ आता खंडणीसाठी चक्क गुटख्याची पुडी; भाईच्या भुरटेगिरीचा आणखी एक नमुना

स्वयंघोषित भाईची भुरटेगिरी अद्याप सुरूच आहे. वडापावची खंडणी मागण्याची घटना ताजी असतानाच आता परत भाईच्या भुरटेगिरीचा प्रकार समोर आला आहे. आता चक्क खंडणीपोटी गुटख्याची पुडी मागितल्याची घटना घडली.

पिंपरी-चिंचवडमध्ये खंडणीखोरी आणि हप्ता वसुली सर्रासपणे सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. चिंचवड – मोहननगर येथे दोन आठवड्यांपूर्वी वडापावची खंडणी मागण्याचा प्रकार घडला असताना आता पिंपळे गुरव येथे पान टपरीचालकाकडून 100 रुपये आणि गुटखा पुडी हप्त्यापोटी उकळली.

खंडणी वसुली करणाऱ्या या दोन तरुणांवर सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सांगवी पोलिसांनी कारवाई केली. तसेच, आरोपीचा माफीनामाही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, मी असे कृत्य यापुढे करणार नाही. कोणीच असे प्रकार करू नयेत, असे आवाहन त्याने केले आहे.

नकुल उर्फ नक्या गायकवाड (वय – 20) याला ताब्यात घेतले आहे. त्याचा मित्र आकाश उर्फ आक्या शिवशरण (वय – 19, दोघे रा. जुनी सांगवी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्यामबहादूर प्रतापसिंह (वय – 41, रा. पिंपळे गुरव, मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे.

एका टपरीचालकाला मारहाण करत त्याच्याकडे हप्त्याची मागणी करत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मंगळवारी (13 ऑगस्ट) व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी नकुल याला ताब्यात घेतले. नकुल हा टपरीचालक प्रतापसिंह यांच्याकडे 100 रुपयांचा हप्ता मागत होता. प्रतापसिंह यांनी त्याला 100 रुपये दिले. त्यानंतरदेखील आरोपीने प्रतापसिंह यांना धमकावून मारहाण केली.

तसेच, शिवीगाळ करून पान शॉपच्या गल्ल्यातून जबरदस्तीने सहा हजार रुपये काढून घेतले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी नकुल याला ताब्यात घेतले. नकुलचा मित्र आकाश याने त्याच्या मोबाईलमध्ये या प्रकाराचे चित्रीकरण करून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. आरोपी नकुल याच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. फौजदार चपाले तपास करीत आहेत.