बाजारमूल्यापेक्षा कमी किमतीत वस्तू; अॅमेझॉन, फ्लिपकार्टवर आता करडी नजर

1253

सणासुदींच्या निमित्ताने खरेदी आणि त्यासाठी विविध शॉपिंग वेबसाईट्सवरचे सेल हे गेल्या काही वर्षांतलं ठरलेलं समीकरण आहे. बाजार भावापेक्षा कमी किमतीला वस्तू मिळत असल्याने अनेकजण या सेलचा फायदा घेऊन खरेदी करतात. पण, याचा दुष्परिणाम रिटेल विक्रीवर दिसत असल्यामुळे आता अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर करडी नजर राहणार आहे.

वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी याबाबतचे धोरण गुरुवारी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. गोयल यांच्याकडे रिटेल विक्रेत्यांच्या असंख्य तक्रारी आल्या आहेत. त्यात ई-कॉमर्स कंपन्यांनी रिटेल विक्री आणि ऑनलाईन विक्री यांच्या किमतीत आढळणारी तफावत चिंतेची बाब बनली आहे. ई-कॉमर्स क्षेत्रातील वेबसाईट्सने वस्तू किमी किमतीला विकल्याने रिटेल विक्रेत्यांना प्रचंड नुकसान होतं, जे भरून निघणं जवळपास अशक्य आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या किंमत निश्चितीला मनाई करण्यात आली आहे, असं गोयल यांनी स्पष्ट केलं आहे.

ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या काही दिवसांचे सेल जाहीर करतात. त्या सेलच्या दिवसांतून त्यांना जे उत्पन्न मिळतं, ते त्यांच्या इतर वेळच्या वार्षिक उत्पन्नाच्या निम्मं असतं, अशी माहिती माध्यमांच्या अहवालातून समोर आली आहे. त्याचा संदर्भ देत गोयल म्हणाले की, अशा प्रकारे विक्री करून किंमत निश्चित करण्याने रिटेल क्षेत्राला तोटा होत आहे. तसंच, ई-कॉमर्स कंपन्या स्वतः वस्तू विकू शकत नाहीत. त्यांचं काम हे विक्रेते आणि ग्राहक यांचा समन्वय साधणं इतकंच आहे, असं गोयल यावेळी म्हणाले. त्यामुळे अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन ई-कॉमर्स वेबसाईट्सना एक प्रश्नावली पाठवण्यात आली असून त्याची उत्तरे मागवण्यात आली आहेत, अशी माहिती गोयल यांनी दिली आहे. त्यानुसार कायद्याचं उल्लंघन केलेलं आढळल्यास कारवाई केली जाईल, असंही गोयल यांनी सांगितलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या