Pizza girl!

शेफ विष्णू मनोहर

आपल्या क्षेत्रातला एक सेलिब्रेटी स्टार जेव्हा दुसऱया क्षेत्रात उतरतो तेव्हा तो कशा प्रकारे वागावा याचं उदाहरण म्हणजे वैशाली सामंत..! खरंच वैशालीच्या पिझ्झा बॉक्स या नवीन उपक्रमाला भेट द्यायला गेलो असता.. मला पत्ता सापडत नव्हता. तेव्हा स्वत: वैशाली घ्यायला आली! अन मग मुलाखत रुपात अनेक न दिसलेले पैलू उलगडत गेले वैशालीच्या स्तुत्य उपक्रमाचे..

खरं तर मलासुद्धा खूप उत्कंठा होती वैशालीच्या नवीन उपक्रमाबाबत जाणून घ्यायची. अन मग काय राऊंड डायनिंग टेबलवर मला गप्पांच्या स्वरूपात अनेक उत्तरं मिळाली माझ्या प्रश्नांची अन् अगदी उत्साहात वैशाली सांगत होती. आवडीबद्दल विचारणा केली असता क्षणाचाही विलंब न करता गाणं आणि खाणं हे उत्तर वैशालीने दिलं.

मी तिची मुलाखत घेणार म्हणून वैशाली खूप उत्सुक दिसली. बोलता बोलता जाणवलं की मी तिच्या गाण्याबद्दल जास्त बोलतोय अन् ती खाण्यावर..! गाणं अन खाणं आवडणारी वैशाली खरं तर लहानपणापासूनच जिद्दी होती..! अन त्यात मास्टर्स ऑफ फिशरी सायन्स केलेली वैशाली जेव्हा गाण्याच्या क्षेत्रात जायचा निर्णय घेते तेव्हा तिला सगळ्या घरच्या मंडळीचा पूण पाठिंबा होता..!

खाण्याबद्दल विचारले असता की तुला काय आवडतं? घरच्यांबद्दल विचारणा केली असता वैशाली म्हणाली.. वैशाली माहेरची जोशी.. संपूर्ण शाकाहारी असलेली वैशाली एकत्र कुटुंबातली असल्यामुळे प्रत्येक सण अन त्या सणात होणारे पदार्थ मग ती पुरण पोळी असो का अळूची वडी, पुडाची वडी, वरण भात, बटाटे वडे. सगळं तिला एन्जॉय करायला अन शिकायला आवडायचं.

हिंदुस्थानी सणांबद्दल विचारले असता वैशाली म्हणाली की तिला सगळे सण खूप आनंदाने साजरे करायला आवडतात..! तिला तिच्या आजीच्या हातची चव खूप आवडते. मराठी पदार्थांसोबत पंजाबी, मारवाडी, गुजराथीसुद्धा खूप आवडतं..! आजी कच्छमध्ये राहिली असल्यामुळे गुजराथी पदार्थ खास करून उंधियू तर मेजवानी असते आम्हा सगळ्यांनाच..!

व्यवसाय तर करायचाच होता. जेवणाच्या आवडीमुळे.. मुलाला म्हणजे कुशानला शाळेत सोडताना माझ्यासारख्या 3 मैत्रीणी मला मिळाल्या अन पिझ्झा बॉक्सचा जन्म झाला..! आमच्यापैकी कुणीही थेट या क्षेत्रात नव्हतं पण एक पॅशन होतं आमच्यात… मग काय आम्ही काहीतरी वेगळं करायचं… अन पिझ्झा एक इंटरनॅशनल फूड आहे म्हणून ते निवडलं. 2014 मध्ये पिझ्झा बॉक्स सुरू केला. आज म्हणजे 2019 मध्ये 3 शाखा आहेत. कुठल्याही प्रॉडक्टची फ्रन्चायसी घेण्यापेक्षा आपण आपला ब्रॅण्ड काढावा. कठीण असलं तरी आपलं उत्पादन आणावं हा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला अन तो यशस्वी झाला.

तुला कसं वाटतं एक गाणारं व्यक्तिमत्त्व बिझनेसमध्ये… असं विचारता वैशाली म्हणाली, एक सक्सेसफूल म्हणून प्राऊड फिल करते. किचन… कस्टमर बेस… सगळं काही नवीनच होत तसं… पण सगळी चॅलेंजेस स्वीकारत आज स्वत:च्या हिमतीवर इतका दर्जेदार फूड प्रॉडक्ट सुरू करणाऱया वैशालीला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा…!

pizza-finalll

चॉकलेट पिझ्झा
साहित्य – कणिक 2 वाटया, कोको पावडर 1 वाटी, मीठ 2 ग्रॅम, साखर 10 ग्रॅम, यीस्ट 10 ग्रॅम, चॉकलेट कॅडबरी 2 नग, मिल्क पावडर अर्धी वाटी, पनीर अर्धी वाटी, ब्रिटानिया प्रोसेस चीज अर्धी वाटी, मोझेरेला चीज अर्धी वाटी, बटर 2 चमचे, मध 4 चमचे.

कृती – कणिक, मीठ, कोको पावडर, मिल्क पावडर साखर एकत्र करुन त्याचा पिझ्झा बेस बनवा. पिझ्झा बेस तयार करुन त्याला 10 मिनिट फरमेंट करा. त्यावर पनीरचे तुकडे, कॅडबरी चॉकलेट व चीज पसरवून बेक करा. वरुन मधाचे टॉपींग करुन खायला दया. याचा आकार छोटा असावा व आईक्रीमबरोबर सर्व्ह करावे.

रोल पिझ्झा
साहित्य – मैदा अर्धा किलो, दूध पावडर 100 ग्रॅम, यीस्ट 10 ग्रॅम, तेल 4 चमचे, साखर 1 चमचा, टोमॅटो सॉस 2 चमचे, आलं-लसूण पेस्ट 1 चमचा, मिक्स हर्बस् 1 चमचा, मीठ, साखर, तिखट चवीनुसार, मोझेरोला चीज 4 चमचे, चेड्डार चीज 4 चमचे, सिमला मिरची अर्धी वाटी, व्हिनेगर अर्धा चमचा, दूध पाव वाटी.

कृती – सर्व प्रथम एका पॅनमध्ये बटर घेवून त्यावर लसूण परतून घ्या. नंतर यात चवीनुसार तिखट, बारीक चिरलेला लसूण, मिक्स हर्बस् छान परतून घ्या. नंतर यात टोमॅटो सॉस घालून बारीक चिरलेली सिमला मिरची घाला. नंतर मैदा, यीस्ट, साखर मीठ एकत्र करुन भिजवून घ्या. नंतर त्याची जाडसर पोळी लाटून तयार केलेला मसाला पसरवा. वरुन चीज मिसळून त्याचा रोल तयार करा. 10 ते 15 मिनिटे फुलायला ठेवा, नंतर त्याला दुधाचा वॉश देवून 200 डीग्रीवर बेक करा. नंतर एका तव्यावर थोडे तेल टाकून त्यावर याला क्रीस्पी करा.

fruit-3

फ्रुट पिझ्झा
साहित्य – पिझ्झा बेस 1 नग, ऑरेंज ज्यूस 1 वाटी, मिक्स फ्रुट जॅम 4 चमचे, सफरचंद, संत्र, द्राक्ष 2 वाटय़ा, मध 2 चमचे, बटर 1 चमचा, टुटी फ्रुटी 4 चमचे, मोझेरेला चीज अर्धी वाटी, प्रोसेस चीज अर्धी वाटी, पनीर 1 वाटी

कृती – त्यावर पिझ्झा बेस घेवून त्यावर थोडे बटर, मिक्स फ्रुट जॅम, बारीक केलेली फळे, टुटी फ्रुटी, पनीर, शेवटी दोन्ही चीज घालून 3 ते 4 मिनिट 60 टक्के मायक्रोव्हेववर गरम करा. (टीप – मायक्रोव्हेवमध्ये तयार केलेला पिझ्झा, केक, इत्यादी बेकरीच्या वस्तू ब्राऊन होत नाहीत.)