मध्य प्रदेशमध्ये विमान कोसळले, दोन प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशमधील सागर येथे शुक्रवारी रात्री Cessna 172 बनावटीचे एक खासगी विमान कोसळले. यात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. सागर येथून 14 किलोमीटर अंतरावरील ढाना हवाई हद्दीजवळ विमान दुर्घटनाग्रस्त झाले. दाट धुक्यामुळे वैमानिकाला विमान उतरवताना धावपट्टीचा अंदाज आला नसावा . त्यामुळे चुकीच्या जागी लॅंडीग करताना विमान कोसळले असावे अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, अशोक मकवाना (58) आणि पियूष चंदेल (28) अशी वैमानिकांची नावे आहेत.

दुर्घटनाग्रस्त झालेले विमान वैमानिकांना प्रशिक्षण देणाऱ्या ‘चाईम्स अॅकडमी’चे होते. शुक्रवारी रात्रीच्या वेळी येथील परिसरात दाट धुके होते. त्यामुळे धावपट्टी अस्पष्ट दिसत असल्याने या दोन पायलट्सनी अंदाजाने धावपट्टीवर विमान उतरवण्याचा प्रयत्न केला. पण विमान धावपट्टीवर न उतरता बाजूच्या  शेतात कोसळले. ‘चाईम्स अॅकडमी’चे अधिकारी राहुल शर्मा यांनीही विमान दुर्घटनेच्या वृत्तास दुजोरा दिला आहे.

दरम्यान, या विमान अपघाताप्रती मुख्यमंत्री कमलनाथ आणि माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शोक व्यक्त केला आहे. दोघाही वैमानिकांच्या कुटुंबाच्या दुखात आपण सहभागी असल्याचे चौहान यांनी म्हटले असून परमेश्वर त्यांच्या आत्मह्यास शांती देवे अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.