
बारसू येथे होऊ घातलेल्या रिफायनरीला कायमचे हटवण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वच कष्टकऱ्यांच्या चळवळीची व्यापक बैठक पुणे येथे बोलावण्याचा निर्णय आज कणकवली येथे झालेल्या प्रतिनिधींच्या बैठकीत करण्यात आला. डॉ. भारत पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. बैठकीला कॉ. संपत देसाई, अंकुश कदम, प्रवीण बांदेकर, ऍड. संदीप निंबाळकर, विनायक ऊर्फ बाळू मेस्त्राr यांच्यासह बारसू रिफायनरीविरोधी संघर्ष समितीचे अमोल बोलें, दीपक जोशी यांच्यासह समितीचे प्रतिनिधी व सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सांगलीमधील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. भारत पाटणकर म्हणाले जगभरात नाकारलेले विनाशकारी प्रकल्प कोकणच्या डोक्यावर मारून कोकणला कचराकुंडी बनवत आहेत. या विनाशकारी प्रकल्पाला महाराष्ट्रातून कायमचे हद्दपार केल्याशिवाय आता कष्टकरी जनता गप्प बसणार नाही. हे आंदोलन आता केवळ बारसूचे नसून, ते संपूर्ण महाराष्ट्राचे बनवू असेही ते म्हणाले.
यावेळी बारसू रिफायनरीविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अमोल बोलें, दीपक जोशी, यांनी या आंदोलनाची माहिती सर्वांसमोर सांगितली. पोलिसी अत्याचाराने इथे हद्द पार केली असल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीला संपत देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अंकुश कदम यांनी समारोप केला. यावेळी सुदीप कांबळे, युयुत्सू आरते यांनीही मनोगते व्यक्त केली. युवराज जाधव, महेश पेडणेकर, राहुल कदम यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते

























































