
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत यंदा लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ’आरोग्योत्सव’ साजरा करण्याचे निश्चित केले होते. याअंतर्गत मंडळाने आयोजित केलेल्या प्लाझ्मा दानास भक्तांनी भरघोस प्रतिसाद देत अवघ्या 14 दिवसांत 100 जणांनी प्लाझ्मादान केले आहे. येत्या 31 ऑगस्ट पर्यंत सुरु राहणाऱ्या या प्लाझ्मादान शिबीरात येत्या काळात आणखीन रुग्णांनी पुढे यावे, असे आवाहन मंडळाकडून यानिमित्ताने करण्यात आले आहे.
मुंबईसह जगभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आपला उत्सव रद्द करीत आरोग्योत्सव साजरा करण्याचे जाहीर केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मंडळाने हा निर्णय घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते या ’आरोग्योत्सवा’ला सुरुवात करण्यात आली होती. केईएम रुग्णालयाच्या सहकार्याने हा उपक्रम 31 ऑगस्टपर्यंत चालणार असून मंडळाच्या या उपक्रमाला सध्या भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. 4 ऑगस्टपासून सुरु झालेल्या या उपक्रमासाठी आतापर्यंत तब्बल 250 हून अधिक जणांनी वैद्यकीय चिकित्सा पूर्ण केली आहे. त्यातील एकूण 100 जणांनी प्लाझ्मा दान केले आहे. अवघ्या चौदा दिवसांत प्लाझ्मा दानाने शतक पार केले आहे. मंडळाने केलेल्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या उपक्रमाबद्दल अधिक माहिती देताना मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी म्हणाले की, कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी आम्ही केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला असून मोठय़ा संख्येने प्लाझ्मादानासाठी पुढे आले आहेत. त्यामुळेच अवघ्या चौदा दिवसांत आम्ही प्लाझ्मा दानाची शंभरी पूर्ण करु शकलो आहे. मंडळाने अत्यंत सुरक्षितरित्या आणि नियोजनबद्ध पद्धतीने या उपक्रमाला सुरुवात केली असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. 31 ऑगस्टपर्यंत हा उपक्रम सुरु राहणार असून प्लाझ्मादानासाठी मोठय़ा संख्येने मुंबईकर पुढे येतील, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

























































