
राज्य सरकारच्या प्लास्टीक मुक्ती धोरणानुसार अलिबाग नगरपालिकेने शहरात प्लास्टीक मुक्तीची मोहीम हाती घेतली असून त्यासंदर्भात कडक कारवाईला सुरूवात केली आहे. अलिबागचे मुख्याधिकारी महेश चौधरी स्वतः या धाडसत्रात सहभागी होत असून आज पहिल्याच दिवशी 20 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
आज सकाळपासूनच महेश चौधरी हे अलिबागच्या बाजारपेठेत तसेच भाजी मंडई, मासळी बाजार परीसरात कर्मचाऱ्यासह फिरत होते. दुकानांची तपासणी करून बंदी असलेले प्लास्टीक जप्त केले जात होते. तसेच हे प्लास्टीक वापरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जात होती. अनेकदा यामध्ये वादाचे प्रसंग ओढवत होते. परंतु मुख्याधिकारी चौधरी यांनी कोणतीही तमा न बाळगता कारवाईची मोहीम सुरूच ठेवली. आज सकाळच्या सत्रात केलेल्या कारवाईत 20 हजार रूपये इतका दंड वसूल करण्यात आला तर बंदी असलेल्या प्लास्टीकच्या 20 किलो पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत.
बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर अथवा साठा किंवा विक्री करताना आढळणार्या प्रत्येक व्यक्तीस पहिल्या अपराधासाठी 5 हजार रुपये दंड तर दुसर्या अपराधासाठी 10 हजार रुपये तसेच तिसर्या अपराधासाठी 25 हजार रुपये दंड आणि 3 महिने कारावासाची शिक्षेची तरतूद आहे असे असतानाही अलिबाग शहरात बंदी असलेल्या प्लास्टीक विशेषतः पिशव्यांचा वापर सुरू आहे.
अलिबाग नगरपालिकेने प्लास्टीक मुक्तीसाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यासाठी काही दिवसांपूर्वीच शहरातील व्यापारी, किरकोळ विक्रेते, फळवाले, भाजीपाला, मटण मासळी विक्रेते यांची संयुक्त बैठकदेखील आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत चित्रफितीद्वारे कोणत्या कोणत्या प्रकारच्या प्लास्टिक वापराला बंदी आहे आणि कोण कोणत्या प्रकारच्या प्लास्टिक वापराला परवानगी आहे याची माहिती देण्यात आली. तसेच प्लास्टीक बंदी का आवश्यक आहे. याबाबतदेखील मार्गदर्शन करण्यात आले.
शासनाच्या प्लास्टीक बंदीच्या निर्णयाची अलिबाग नगरपालिकेने कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी आम्ही सर्वांना सूचना दिल्या आहेत. तरीदेखील कुणी जुमानत नसेल तर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी दररोज धाडसत्र सुरू करण्यात आले असून सकाळी व संध्याकाळी अशा दोन सत्रात ही कारवाई केली जाणार आहे.
– महेश चौधरी , मुख्याधिकारी अलिबाग नगरपालिका



























































