15 ऑगस्टपासून माऊंट अबूवर प्लॅस्टिकबंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, माऊंट अबू

येत्या 15 ऑगस्टपासून ‘माऊंटअबू’वर प्लॅस्टिकबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी आणि वनविभागाने घेतला आहे. पर्यावरण त्याचबरोबर येथील वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्लॅस्टिक पिशव्या, बॉक्स, थर्माकोलच्या वस्तू, प्लेस्ट्स, कप यांसारख्या प्लॅस्टिक वस्तूंना यापुढे माऊंटअबू येथे बंदी असणार आहे. पाण्याच्या हवाबंद बाटल्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात येणार असून पर्यटकांसाठी जागोजागी स्वस्त दरात पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी माहिती माऊंट अबूचे उपविभागीय अधिकारी डॉ.रवींद्र गोस्वामी यांनी स्पष्ट केले.

ह प्लॅस्टिकचा वापर करणाऱयांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी एक टीम तयार करण्यात येणार असून प्लॅस्टिक वापरावर ही टीम लक्ष ठेवून असणार आहे. माऊंट अबू येथील दुकानदार, ग्राहक, विक्रेते यांची बैठक बोलवून प्लॅस्टिकबंदीची माहिती देण्यात आली.

बीअर बाटल्यांऐवजी बीअरचे कॅन
बीअरच्या रिकाम्या बाटल्या ही माऊंटअबूमधील डोकेदुखी ठरली असून या रिकाम्या फुटलेल्या काचेच्या बाटल्यांमुळे वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे डॉ. गोस्वामी यांनी बीअरच्या बाटल्यांऐवजी बीअरचे कॅन वापराला प्रोत्साहन देण्याचे ठरविले आहे. बीअरच्या रिकाम्या बाटल्या या जंगल परिसरात टाकल्या जातात. गेल्या काही दिवसांत स्वच्छता मोहिमेत तीन ट्रक्टर बीअरच्या रिकाम्या बाटल्या गोळा करण्यात आल्या होत्या. विक्रेत्यांसोबत डॉ. गोस्वामी यांची नुकतीच बैठक पार पडली असून बीअर बाटल्यांऐवजी बीअरचे कॅन विक्रीला प्रोत्साहन देण्यास सांगितले आहे. माऊंट अबूमध्ये 5 परवानाधारक दारू विक्रेत्यांची दुकाने असून महिन्याला 40 ते 50 हजार बीअरच्या बाटल्यांची विक्री होते.