जालन्यात 4 टन प्लास्टीक पिशव्या जप्त

सामना प्रतिनिधी । जालना

नगरपालिकेने गुरुवारी दुपारी प्लास्टिक व कॅरीबॅग बंदीसंदर्भात कारवाईची धडक मोहीम हाती घेत शहरातील जुन्या मोंढ्यात 4 ते 5 गोदामातून सुमारे 4 टन प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. दरम्यान, अचानक मारलेल्या छाप्यांमुळे खळबळ उडाली आहे. ही कारवाई मुख्याधिकारी संतोष खांडेकर व त्यांच्या पथकाने केली.

जालना शहरात 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅग विक्री, तसेच वापरावर बंदीसाठी नगरपालिकेने विशेष मोहीम हाती घेत कारवाया करण्यास गेल्या काही दिवसांपासून सुरुवात केली. मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी यासाठी वेगवेगळ्या पथकांची नियुक्ती केली. या पथकातील एका पथकाने दुपारी जुन्या मोंढयात पाहणी केली. त्यात काही गोडाऊनमध्ये प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा साठा असल्याचे त्यांना समजले. त्यांनी तात्काळ मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना ही बाब सांगितली. ते क्षणाचा विलंब न करता ऑन दि स्पॉट दाखल झाले. यावेळी जून्या मोंढयातील गायत्री ट्रान्सपोर्ट, गिरीराज ट्रान्सपोर्ट, नॅशनल ट्रान्सपोर्ट, सुरत ट्रान्सपोर्ट व खासगी गोदामातून 90 ते 95 प्लास्टिक पिशव्यांनी भरलेले 30 किलो डाग असा एकूण 4 टन प्लास्टिकच्या पिशव्या जप्त केल्या. संबंधीत व्यापाऱ्यांना 5 हजार रूपये दंड ठोठावला असून, प्लास्टिकच्या बॅगचा साठा जप्त केला आहे.