
सामना प्रतिनिधी, मुंबई
प्लॅस्टिकविरोधात पालिकेची मुंबईभरात जोरदार कारवाई सुरू असून प्लॅस्टिक जप्त करण्यात दुप्पट वाढ झाली आहे. फेब्रुवारीत सरासरी 80 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले होते, मात्र मार्चमध्ये फक्त 20 तारीखपर्यंत तब्बल 161 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून 1 लाख 5 हजारांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
राज्य सरकारने 23 जानेवारीपासून राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू केल्यानंतर पालिकेनेदेखील जोरदार कारवाई सुरू केली आहे. मुंबईभरात 310 निरीक्षकांच्या टीम तयार करून ही कारवाई करण्यात येत आहे. या निरीक्षकांच्या ‘ब्ल्यू स्कॉड’मध्ये मार्केट, परवाना आणि आस्थापना विभागातील कर्मचाऱयांचा समावेश आहे. निळा कोट आणि काळी टोपी घातलेल्या या निरीक्षकांकडून कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत प्रत्येक दिवशी 60 हजार ते एक लाखापर्यंत सरासरी दंड वसूल करण्यात येत आहे. काही दिवशी दंडवसुलीचा आकडा तब्बल तीन लाखांपर्यंतही जात आहे.
अशी झाली कारवाई
फेब्रुवारी महिन्यात एकूण 6168 दुकाने-आस्थापनांना भेट देऊन कारवाई करण्यात आली. यात 85.130 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून 1 लाख 86 हजार 188 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
मार्चच्या 20 तारीखपर्यंत 3521 दुकाने-आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. या कारवाईत 161.975 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून फक्त 20 दिवसांतच 1 लाख 5 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
निवडणूक कामाचा फटका
पालिकेची प्लॅस्टिकविरोधात जोरदार कारवाई सुरू असली तरी आगामी लोकसभा निवडणुकीचा फटका या मोहिमेला बसणार आहे. कारण प्लॅस्टिकबंदीसाठी काम करणारे 100 हून अधिक अधिकारी ‘इलेक्शन डय़ुटीवर’ पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळात प्लॅस्टिकविरोधातील कारवाईला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.




























































