G7 शिखर परिषद हिंदुस्थानसाठी महत्त्वाची; जागतिक नेत्यांची मोदींनी घेतली भेट

जी 7 शिखर परिषद इटलीत सुरू झाली आहे. या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीत पोहचले असून त्यांनी अनेक जागतिक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या असून देशासाठी ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा मोदी यांचा हा पहिलाचा परदेश दौरा आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ या नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी शिखर परिषेदेसाठी आलेल्या नेत्यांचे स्वागत केले. हिंदुस्थान G7 परिषदेत अतिथी देश म्हणून सहभागी होतो. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मुद्द्यांवर बोलण्याची शक्यता आहे. जगात सध्या दोन युद्धे सुरू आहेत. तसेच चीन आणि अमेरिकेत स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे या परिषदेत अनेक जागतिक मुद्यांवर चर्चा होणार आहे. चीन, युक्रेन, इस्त्राईल, हमास यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधानांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली आहे. तसेच त्यांनी इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली असून त्यांच्याशी चर्चाही होणार आहे. झेलेन्स्की यांच्या भेटीनंतर, पंतप्रधान मोदी म्हणाले की, ही एक सकारात्मक भेट होती. हिंदुस्थान-युक्रेन द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. युक्रेन- रशिया युद्धाबाबत ते म्हणाले की, हिंदुस्थान मानव-केंद्रित दृष्टिकोनावर विश्वास ठेवतो आणि शांततेचा मार्ग संवाद यावर आमचा भर आहे.

शिखर परिषदेसाठी रवाना होताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, पंतप्रधान म्हणून तिसऱ्या कार्यकाळातील त्यांचा पहिला परदेश दौरा G7 शिखर परिषदेसाठी इटलीला आहे ही आनंदाची बाब आहे. आपण 2021 मधील G20 शिखर परिषदेसाठी इटलीला आलो होतो. त्याची आठवण आपल्याला आहे. हिंदुस्थान-इटली धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, आणि इंडो-पॅसिफिक आणि भूमध्यसागरीय प्रदेशांमध्ये सहकार्य वाढवण्यावर आमचा भर आहे, असे ते म्हणाले. इटली हा युरोपियन युनियनमधील हिंदुस्थानचा चौथा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. त्यामुळे मोदी यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.