प्रॅक्टीस झाली; आता प्रत्यक्ष कृती करायची आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पाकिस्तानने हिंदुस्थानी हवाईदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सोडण्याचा घेतलेला निर्णय हा हिंदुस्थानचा विजय असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. या विजयामुळे हिंदुस्थानचे एक पायलट प्रोजक्ट यशस्वी झाल्याचे ते म्हणाले. दोन्ही देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी हिंदुस्थानी हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी सांगितले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही प्रतिक्रिया दिली. आतापर्यंत प्रॅक्टीस केली, आता प्रत्यक्षात कृती करायची आहे, असा इशाराही मोदी यांनी पाकिस्तानला दिला. नवी दिल्लीत विज्ञान भवनात आयोजित शांती स्वरूप भटनागर पुरस्कार वितरण सोहळ्यात मोदी बोलत होते.

दोन्ही देशात शांतता प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही पकडलेल्या हिंदुस्थानी हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना शुक्रवारी वाघा बॉर्डवरून हिंदुस्थानात पाठवणार असल्याचे इमरान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेत सांगितले. मात्र, आमच्या या निर्णयाला आमची कमजोरी समजण्यात येऊ नये, असेही ते म्हणाले. दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, याआधीचे अनुभव लक्षात घेता पाकिस्तानवर विश्वास ठेवता येणार नाही, असे हिंदुस्थानने याआधीच स्पष्ट केले आहे.

अभिनंदन यांना पाकिस्तानने सोडण्याचा निर्णय जाहीर करणे हा हिंदुस्थानचा विजय असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. आता प्रॅक्टीस पूर्ण झाली असून प्रत्यक्ष कृती करायची आहे, असा इशाराही त्यांनी पाकिस्तानला दिला. इच्छाशक्ती असेल तर मर्यादीत साधनांमध्येही अभूतपूर्व यश मिळवता येते, हे आपल्या अंतराळ कार्यक्रमातून दिसून येते असेही मोदी म्हणाले. विज्ञानाशी संबंधित देशातील संस्थानी काळाची गरज ओळखून त्यानुसार बदल करण्याची गरजही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली.