‘The Kashmir Files मान्य नाही, त्यांनी…’; पंतप्रधान मोदींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाद्यांना दिला हा सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
PM-MODI

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
या चित्रपटावरून सर्वच स्तरावर चर्चा सुरू आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या चित्रपटावरून भाष्य करताना एरव्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्या आणि आता ‘द कश्मीर फाइल्स’वर गळे काढणाऱ्यांना सल्ला दिला आहे. एरव्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे आता मात्र ‘द कश्मीर फाइल्स’च्या विरोधात गळे काढत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे झेंडे घेऊन फिरणारे ते लोक कश्मीर बाबतचे सत्य समोर येत असल्याने बिथरले आहेत. त्यांनी जे सत्य लपवून ठेवलं ते आता उघड झाल्याने त्यांचा विरोध होत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

कोणी सत्य समोर आणण्याचे साहस करत असेल. त्याला जे सत्य वाटलं ते त्यानं समोर मांडलं. मात्र हे सत्य समजून घेण्याची तयारी नाही, इतकंच काय तर ते सत्य लोकांना समजू नये म्हणून त्याला दाबण्यासाठी षडयंत्र रचले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, माझा विषय चित्रपट नसून जे ‘सत्य’ आहे त्याला देशाच्या हितासाठी समोर आणणे आहे. त्याचे अनेक पैलू असू शकतात. ज्यांना हा पैलू मान्य नसेल त्यांनी दुसरी बाजू मांडावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे. कुणी रोखलं आहे त्यांना? असा सवालही त्यांनी केला आहे.

अनेक ठिकाणी चित्रपटगृहांबाहेर हाऊसफूलचे बोर्ड लागले आहेत. लोकांच्या पसंतीस उतरलेल्या या चित्रपटावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही भाष्य केले आहे. भाजपच्या संसदीय पक्षबैठकीसाठी जमलेल्या नेत्यांना ‘द कश्मीर फाईल्स’ आवर्जून पाहण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. असे आणखी चित्रपट बनविण्याची गरज असल्याचे मतही मोदींनी व्यक्त केले आहे. ‘या चित्रपटाचे तथ्यांच्या आधारावर अभ्यास, परीक्षण करण्याऐवजी याच्याविरोधात एक मोहीम चालवण्यात आली आहे. सत्य देशाच्या नागरिकांसमोर आणलं पाहिजे. सत्यासाठी जगणाऱ्यांनी अशा सत्याच्या बाजूने उभे राहण्याची गरज आहे.

भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक आज दिल्लीमध्ये पार पडली. या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. याच बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटावर भाष्य केल्याची माहिती ‘इंडिया टूडे’ने दिली आहे. ‘द कश्मीर फाईल्स’ सारखे आणखी चित्रपट बनविण्याची गरज आहे. अशा चित्रपटांमधून सत्य जनतेसमोर येते. गेल्या अनेक दशकांपासून जे सत्य लपविण्याचा प्रयत्न झाला ते समोर आणले जात आहे. त्यामुळे जे लोक सत्य लपवण्याचा प्रयत्न करताहेत ते आज विरोध करत आहेत असा टोलाही त्यांनी लगावला.