स्वातंत्र्यदिनी मोदी गांधीवादी झाले!काँग्रेसप्रमाणेच दिला स्वदेशीचा नारा

देशाच्या 79व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधीवादी झाले. एरव्ही काही ना काही कारण शोधून गांधी-नेहरूंच्या नावाने बोटं मोडणाऱया मोदींनी आज लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना महात्मा गांधीजींच्या स्वदेशीच्या नाऱयाचा पुकारा केला.

देशाच्या मातीचा सुगंध असलेल्या वस्तूच खरेदी केल्या पाहिजेत म्हणजे हिंदुस्थान समृद्ध होईल, पुढे जाईल. व्यापाऱयांनीही येथे स्वदेशी वस्तू विकल्या जातात असे फलक लावावेत. स्वदेशीचा वापर सक्ती म्हणून नाही, तर ताकदीसाठी करूया, असे मोदी म्हणाले. संवेदनशील व महत्त्वाची ठिकाणे, मोठी शहरे, प्रकल्प आणि लष्करी तळ यांच्या सुरक्षेसाठी स्वदेशी सुरक्षा कवच म्हणजेच ‘सुदर्शन चक्र’ तयार करण्याची घोषणा मोदी यांनी केली.
पाकिस्तान, चीन या शेजारील देशांकडून सीमा भागात वारंवार होणारी आगळीक मोडून काढण्यासाठी आणि देशाच्या सीमेवरील आणि देशांतर्गत सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी मोदींनी स्वदेशी शस्त्रास्त्रनिर्मितीची घोषणा केली. 2035 पर्यंत ‘सुदर्शन चक्र’ हे स्वदेशी सुरक्षा कवच सक्रिय करण्यात येईल, असे मोदी म्हणाले.

सर्वच भाषा समृद्ध व्हाव्यात

देशातील सर्वच भाषा समृद्ध झाल्या पाहिजेत. आम्ही मराठी, आसामी, बांगला, पाली, संस्कृत या भाषांना अभिजात भाषांचा दर्जा दिला आहे. आपल्या सर्व भाषांचा विकासासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत, असे आवाहनही मोदींनी यावेळी केले.

पहिली नोकरी मिळवणाऱयांना तरुणांना 15 हजार देणार

खासगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱया तरुणांना पंतप्रधान विकसित भारत योजनेअंतर्गत केंद्र सरकार 15 हजार रुपये देईल, अशी घोषणा मोदींनी केली. या योजनेसाठी 1 लाख कोटींहून अधिक रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी आणणाऱया कंपनीला प्रोत्साहन देण्यात येईल. त्यामुळे तब्बल साडेतीन कोटी तरुणांना नव्या संधी प्राप्त होतील, असेही ते म्हणाले.

मेड इन इंडिया सेमीकंडक्टर चिप्स आणणार

2025 च्या अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर चिप्स बाजारात उपलब्ध होणार असल्याचे मोदी म्हणाले. देशातील कर्तृत्वांना सोशल मीडियासारखे स्वदेशी तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म विकसित करण्याचे आवाहनही त्यांनी केले. देशात सेमीकंडक्टर सुरू करण्याचा विचार 50 ते 60 वर्षांपूर्वी सुरू झाला होता; परंतु आमच्या सरकारने मिशन मोडमध्ये सेमीकंडक्टर उद्योगावर काम सुरू केले. तोपर्यंत ही योजना आजतागायत रखडली होती. सध्या सहा चिप प्रकल्पांची उभारणी प्रगतीपथावर असून आणखी चार प्रकल्पांना हिरवा कंदिल दाखवल्याचे मोदी म्हणाले.

मोदींचा दावा खोटा – काँग्रेस

हिंदुस्थानने सेमीकंडक्टर तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी 50 ते 60 वर्षे लावली हा मोदींचा दावा साफ खोटा असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी मोदींच्या दाव्यावर टीका केली आहे. चंदीगडमध्ये सेमीकंडक्टर्स कॉम्प्लेक्स लिमिटेडचे काम 1983 साली सुरू झाले होते, अशी पुस्तीही जयराम रमेश यांनी जोडली आहे.

संघाने ब्रिटिशांचा हस्तक म्हणून काम केले – ओवेसी

मोदींनी स्वातंत्र्यलढय़ाचा अवमान केला. संघ आणि त्यांच्या सहकाऱयांनी ब्रिटिशांचा हस्तक म्हणून काम केले. त्यांनी ब्रिटिशांना विरोध करण्याऐवजी गांधीजींचा अधिक द्वेष केला, अशा शब्दांत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून संघावर स्तुतिसुमने उधळल्याप्रकरणी जोरदार टीका केली. स्वयंसेवक म्हणून आरएसएसची स्तुती करण्यासाठी ते नागपूरला जाऊ शकले असते; पण पंतप्रधान म्हणून लाल किल्यावरून असे करण्याची काय गरज होती, असा सवालही त्यांनी केला.

स्वातंत्र्यलढय़ात संघाचे योगदान काय – काँग्रेस

देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात संघाचे योगदान काय, असा सवाल काँग्रेस खासदार मणिकमम टागोर यांनी केला आहे. गेल्या 52 वर्षांपासून त्यांनी तिरंगाही फडकवलेला नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आरएसएसचे संस्थापक हेगडेवार यांनी 1925 नंतर सांस्कृतिक राष्ट्रवादावर लक्ष केंद्रित केले, ब्रिटिश शासनाविरोधात कोणताही संघर्ष केला नाही, असेही टागोर म्हणाले.

अकरा वर्षांत प्रथमच संघस्तुती!

देशाला संबोधित करताना प्रथमच मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्तुती केली. ही जगातील सर्वात मोठी संस्था आहे. संघाची शंभर वर्षांची राष्ट्रसेवा अभिमानास्पद आहे, असे मोदी म्हणाले. मोदी सप्टेंबरमध्ये 75 वर्षांचे होतील तेव्हा त्यांना पदावर कायम राहण्यासाठी मोहन भागवतांच्या आशीर्वादाची गरज लागणार आहे. त्यासाठीच हे गुणगाण आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी त्यावर दिली.

एक लाख कोटी नोकऱयांचा जुमला !

मोदी अकरा वर्षांनंतरही तोच जुमला आणि तेच आकडे देत आहेत. गेल्या वर्षी एक लाख कोटी इंटर्नशिपचा वादा करण्यात आला होता. आता एक लाख कोटी नोकऱयांची योजना जाहीर करण्यात आली. नेमकं खरं काय, असा सवाल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. प्रत्यक्षात स्टायपेंड अत्यल्प असल्याने फारसा प्रतिसाद मिळत नाही. गेल्या वर्षभरात इंटर्नशिपचा आकडा दहा हजारांपेक्षाही कमी आहे. सरकारनेच संसदेत ही माहिती दिलेली आहे, असे नमूद करतानाच मोदींकडे आता कोणतीही नवी आयडिया नाही. या सरकारकडून बेरोजगारांना नोकऱया नाही केवळ जुमलाच मिळेल, अशी तोफ राहुल यांनी डागली.