दहशतवादाविरोधात सर्व देशांनी एकजूट होऊन लढण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहशतवाद आणि हिंसाचारातून कोणाचाही फायदा होणार नाही. पण ज्या प्रकारे आज लोक दहशतवादाचे समर्थन करण्यासाठी खुलेपणाने पुढे येत आहेत, तो एक जागतिक चिंतेचा विषय बनला आहे. या वातावरणात जगातील सर्व देशांनी, सर्व देशांच्या सरकारांनी, सर्व धर्मांच्या लोकांनी एकजूट होऊन दहशतवादाविरोधात लढण्याची गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस देशभरात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने एका कार्यक्रमात संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादाचे समर्थन करणारी भूमिका घेणाऱयांचा चांगलाच समाचार घेतला. पुलवामा हल्ला आणि वीर जवान शहीद झाले असताना काही लोक या दुःखात सहभागी नव्हते. हे लोक त्यातही राजकीय स्वार्थ शोधत होते, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

देशहित हेच सर्वोच्च हित

देशहितासाठी, देशसुरक्षेच्या हितासाठी, जवानांचे मनोबल कमी व्हावे यासाठी तुम्ही राजकारण करू नका. आपण देशविरोधी लोकांच्या हातातील बाहुले होत तुम्ही ना देशाचे ना आपल्या राजकीय पक्षाचे हित करू शकता. देशहित हेच सर्वोच्च हित आहे, असे मोदी म्हणाले.