20 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आणखी कडक, ‘हॉटस्पॉट’ बद्दल पंतप्रधान मोदींचा गंभीर इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘देशातल्या जनतेला मी निवेदन करतो की कोणत्याही परिस्थितीत आता कोरोनाला नव्या भागात बसू द्यायचे नाही. स्थानिक स्तरावर जर एक रुग्णही वाढला तर आपली चिंता वाढेल. म्हणून हॉटस्पॉट अंकित करून पहिल्या पेक्षा अधिक, अधिकाधिक सतर्कता पाळावी लागेल.  हॉटस्पॉटच्या प्रत्येक बदलावर बारीक नजर ठेवावी लागेल. नवे हॉटस्पॉट निर्माण झाल्यास आपले तप, मेहनत यासमोरील आव्हान वाढेल. संकट निर्माण होईल. म्हणून पुढला एक आठवडा म्हणजे 20 एप्रिल पर्यंत प्रत्येक विभाग, गल्ली, मोहल्ला यांचे बारकाईने निरीक्षण केले जाईल. ज्या भागात लॉकडाऊनचे पालन कठोरपणे केले जाईल, कोरोनाचे रुग्ण आढळणार नाही, त्यांना 20 एप्रिलनंतर काही आवश्यक गोष्टींसाठी अटी आणि नियम घालून सूट दिली जाईल. मात्र अटी आणि नियम मोडल्यास सूट पुन्हा मागे घेतली जाईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी निवेदनातून दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला उद्देशून केलेल्या निवेदनात लॉकडाऊनचा दुसरा टप्पा 3 मे पर्यंत असल्याची घोषणा केली. मात्र असे असले तरी ज्या भागांमध्ये लॉकडाऊनचे कठोरपणे पालन केले जात असेल त्या भागांना काही सूट देण्याचे देखील त्यांनी सांगितले. दरम्यान, सूट दिल्यानंतर घालून दिलेल्या अटी आणि नियमांचे पालन न केल्यास दिलेली सूट परत मागे घेतली जाईल, असा इशारा देखील त्यांनी आपल्या निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा जनतेच्या धैर्याचे देखील कौतुक केले, तसेच पुढील काळामध्ये सात गोष्टींवर विशेष लक्ष देण्यास जोर दिला आहे. ज्याला देशहितासाठीची ‘सप्तपदी’ असेही नाव त्यांनी दिले. जगभराच्या तुलनेत आपल्या देशाने वेळीच योग्य ती खबरदारी घेतल्यामुळे आपल्याकडे इतर देशांसारखा रोग प्रसार झाला नाही आणि आणि देश मोठ्या संकटातून वाचला, असेही ते म्हणाले.

मोदींनी आपल्या निवेदनाची सुरुवातच गमछा तोंडाला लावून केली. कोरोनामुळे होणारे नुकसान टाळण्यास आपण आतापर्यंत यशस्वी राहिलो. शिस्तप्रिय जवानाप्रमाणे सर्व नागरिक वागत असून मी त्यांना नमन करतो. बाबासाहेबांचे जीवन आपल्याला संकल्प आणि परिश्रमाच्या बळावर कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी प्रेरणा देते. हिंदुस्थान उत्सव साजरा करणारा देश आहे. अनेक राज्यात नवीन वर्षाची सुरुवात झाली, मात्र लॉकडाऊनच्या काळात लोक संयमाने आणि साधेपणाने उत्सव, सण साजरे करत असून हे प्रेरणादायी आहे.

आज संपूर्ण जगात कोरोना महामारी थैमान घालत आहे. अन्य देशांच्या तुलनेत हिंदुस्थानने कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना केल्या. एकही केस नसतानाही विमानतळावर स्क्रीनिग सुरू केली. 100 रुग्ण होण्यापूर्वी विदेशातून येणाऱ्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आले, मॉल, बाजार बंद करण्यात आले. 550 केस असतानाच देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले. समस्या वाढण्याची वाट पाहण्यापूर्वी त्याला रोखण्यासाठी पावले उचलण्यात आली. हे एक वैश्विक संकट असल्याने कोणत्याही देशाशी तुलना होऊ शलत नाही. परंतु जगातील मोठमोठ्या देशांची आकडेवारी पाहिल्यास आपण चांगल्या स्थितीत आहोत. महिन्याभरापूर्वी आपणही त्यांच्या सोबत होतो, मात्र आज तेथे हजारो लोकांचा बळी गेला आहे. हिंदुस्थानने वेगाने निर्णय घेतला नसता तर आज आपल्या येथील परिस्थिती काय असती याची कल्पना करून अंगावर काटा येतो.

सोशल डिस्टनसिंग आणि लॉकडाऊनचा आपल्याला फायदा झाला आहे. आर्थिक दृष्ट्या आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागली, मात्र देशवासीयांच्या जीवापुढे याची काहीच किंमत नाही. हिंदुस्थानने जी पावले उचलली त्याचे जगभरात कौतुक होत आहे, त्याची चर्चा सुरू आहे. राज्य सरकार आणि सामाजिक संस्थांनी यात मोठे योगदान दिले आहे. मात्र तरीही कोरोना ज्या प्रकारे पसरत आहे त्यामुळे जग अधिक सतर्क झाले आहे. कोरोनावर विजय कसा मिळवावा, लोकांच्या समस्या कशा कमी करता येतील यासाठी राज्य सरकारशी चर्चा निरंतर सुरू आहेत. अनेक राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली. काहींनी आपल्या राज्यात लॉकडाऊन वाढवले. त्यामुळे केंद्रानेही 3 मे पर्यंत देशात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 20 एप्रिल पर्यंत देशातील प्रत्येक राज्यातील स्थितीचे आकलन करण्यात येईल आणि काही निवडक ठिकाणी सूट देण्यात येईल, असेही मोदी म्हणाले. तसेच येत्या काळात घरातून बाहेर पडण्याचे नियम अधिक कडक करण्यात येतील असेही मोदी यावेळी म्हणाले. याबाबत उद्या गाईडलाईन्स जारी करण्यात येईल.

देशात सध्या 600 पेक्षा जास्त रुग्णालयात कोरोनावर उपचार सुरू असून 1 लाख बेडची व्यवस्था करण्यात आली आहे, असेही मोदी म्हणाले. देशातील हॉटस्पॉट असणाऱ्या भागांवर नजर ठेवून असल्याचेही ते म्हणाले.