आधी तुम्ही चार पिढ्यांचा हिशेब द्या, मग मी चार वर्षांचा देईन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अंबिकापूर

सरकार हे फक्त श्रीमंतांचे नसते, ते गरीबांचेही असते. ‘सबका साथ, सब का विकास’ हा आमचा मंत्र असून आम्हाला भाजपला मतदान न करणाऱ्यांचाही विकास करायचा आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील चार पिढ्यांनी काँग्रेसचा अनुभव घेतला आहे. आधी तुम्ही या चार पिढ्यांसाठी काय केले याचा हिशेब द्यावा मग मी चार वर्षांचा हिशेब देईन, असे थेट आव्हानच काँग्रेसला दिले.

चहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप पार उडाली आहे असे टीकास्र छत्तीसगडमधील अंबिकापूरच्या प्रचार सभेत सोडत मोदी म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी अंबिकापूरमध्ये आलो त्यावेळी तुम्ही माझ्या सभेसाठी लाल किल्ल्याची प्रतिकृती तयार केली होती, पण हे पाहून काही लोकांना खरे वाटले नव्हते. मोदी लाल किल्ल्यावरून भाषण करू शकतात हा विचारही लोक कसा करू शकतात, असा प्रश्न काही लोकांना पडला होता. अशा लोकांना उत्तर देण्याची संधी तुम्हाला दुसऱ्यांदा मिळत आहे.

‘काही लोकांना वाटायचे की, लाल किल्ल्यावरून भाषण करण्याचा अधिकार फक्त एकाच कुटुंबाला आहे. एका चहावाल्याला गादी (सत्ता) मिळाल्याने काँग्रेसची झोप उडाली आहे.’ – नरेंद्र मोदी