संयुक्त राष्ट्रसंघात निर्णायक अधिकार कधी मिळणार, हिंदुस्थानने किती वाट बघायची? पंतप्रधान मोदींनी ठणकावले

जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असलेल्या हिंदुस्थानला संयुक्त राष्ट्र संघात (युनो) निर्णायक अधिकार कधी मिळणार? हिंदुस्थानने त्यासाठी किती काळ वाट बघायची? असे थेट सवाल करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकाविले.

संयुक्त राष्ट्र संघाची 75 वी आमसभा व्हर्च्युअल झाली. व्हिडीओ संदेशद्वारे पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थितीत करीत कठोर मूल्यमापनही केले. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत पर्मनंट (स्थायी) सदस्य म्हणून अमेरिका, ब्रिटन, रशिया, फ्रान्स आणि चीन हे पाच देश आहे. या सुरक्षा परिषदेत हिंदुस्थानचा पर्मनंट सदस्य म्हणून समावेश करावा यासाठी चीन वगळता चार राष्ट्रांचा पाठिंबा आहे. या मुद्याचा अप्रत्यक्ष उल्लेख करताना पंतप्रधान मोदी यांनी हिंदुस्थानच्या 130 कोटी जनतेच्या आशा-आकांक्षांचा विचार संयुक्त राष्ट्र संघ कधी करणार? आम्हाला किती काळ वाट बघावी लागणार असा खडा सवाल केला.

विश्व कल्याणाची भूमिका हिंदुस्थानने नेहमीच घेतली आहे. आम्ही कोणाशी मैत्री करतो तेव्हा तिसऱया देशाविरोधात नसतो असे त्यांनी निक्षुन सांगितले. संयुक्त राष्ट्र संघाने निश्चितच काही चांगली कामे केली पण काही कमतरताही आहेत. त्याचे मूल्यमापन केले पाहिजे. जगभरात अनेक दहशतवादी हल्ले झाले, निष्पाप लोकांचे रक्त सांडले गेले. त्याविरुद्ध नेहमीच हिंदुस्थानने आवाज उठविला. संयुक्त राष्ट्र संघानेही कठोर भूमिका घ्यायला हवी, असे पंतप्रधानांनी सांगितले.

कोरोना लसीसाठी जगाला मदत करू

जगातील सर्वाधिक लस उत्पादन करणारा देश म्हणून हिंदुस्थान जगाला लसींची मदत देईल असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.

कोरोना महामारीत संयुक्त राष्ट्र संघाने काय भूमिका घेतली? काय मार्गदर्शन, मदत केली? असे सवालही त्यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या