हिंदुस्थानचा चीनला खणखणीत इशारा, दादागिरी नही चलेगी!

pm-modi-leh

विस्तारवादाने जागतिक शांततेला कायमच धोका निर्माण केला आहे. विस्तारवादी भूमिका घेणाऱया शक्ती संपल्या किंवा मागे हटल्या असून, इतिहास याला साक्षी आहे. विस्तारवादाचे युग संपले आहे. आताचे युग विकासवादाचे आहे. हिंदुस्थान कुणासमोरही झुकणार नाही, कुणाची दादागिरी खपवून घेणार नाही. सीमेच्या रक्षणासाठी हिंदुस्थान वचनबद्ध आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला लडाख येथून खणखणीत इशारा दिला. हिंदुस्थानच्या जवानांचे शौर्य हिमालयातील पर्वतरांगांपेक्षा मोठे आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले.

पंतप्रधान मोदी यांनी आज लेह-लडाख येथे अचानक भेट दिली. निमू फॉरवर्ड फ्रंट भागाचाही त्यांनी दौरा केला. लष्करी तळांना भेटी दिल्या. यावेळी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपीन रावत, लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्यासह वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते. पूर्व लडाखच्या सीमेवर गलवान खोऱयात 15 जून रोजी झालेला हिंसक संघर्ष चीनकडून सुरू असलेल्या पुरापती या पार्श्वभूमीवर पंतप्रधानचा हा दौरा महत्त्वपूर्ण ठरला आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी लष्कर, हवाईदल आणि आयटीबीपी जवानांशी संवाद साधला आणि त्यांचे मनोबल वाढविले. यावेळी नाव न घेता चीनला इशारा दिला आहे.

जवानांचे शौर्य हिमालयाच्या पर्वतरांगांपेक्षा मोठे
– लडाखमधील जवानांचे शौर्य हिमालयातील पर्वतरांगांपेक्षाही मोठे आहे. जवानांचे शौर्य, त्यांची जिद्द, भारतमातेच्या रक्षणसाठी जवानांचे सर्मपण अतुलनिय आहे.
– हिंदुस्थानची ओळख बांसुरीधारी श्रीकृष्णाची आहे. तशीच सुदर्शनधारी श्रीकृष्णाचीही आहे.
– शत्रूंनी हिंदुस्थानच्या जवानांची आग पाहिली आणि रागही पाहिला आहे. संपूर्ण जगाने जवानांचा पराक्रम पाहिला आहे. तुमची इच्छाशक्ती अटळ आहे.
– संपूर्ण देशवासियांना जवानांच्या शौर्याबद्दल प्रचंड अभिमान आहे. जवानांविषयी अढळ विश्वास आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी
– हिंदुस्थानने कायमच मानवतेच्या कल्याणासाठी, सुरक्षेसाठी काम केले आहे. जगाच्या विकासासाठी शांतता आवश्यक आहे.
– ज्यांना विस्तारवाद पाहिजे त्यांनी जागतिक शांततेसाठी धोका निर्माण केला आहे. विस्तारवादी भूमिका घेणाऱयांविरोधात सर्व जग एकवटले आहे. हे लक्षात घ्यायला हवे.
– विस्तारवादी भुमिका घेणारे संपले किंवा मागे हटले आहे. याला इतिहास साक्षी आहे. विस्तारवादी युगही संपले असून, आजचे युग विकासवादाचे आहे.

गलवान खोऱयातील जखमी जवानांशी भेट
15 जून रोजी गलवान खोऱयात चीनी सैनिकांबरोबर झालेल्या संर्घषात 20 जवान शहीद झाले. जखमी जवानांवर लेहमधील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंतप्रधान मोदी यांनी आज जखमी जवानांची भेट घेतली आणि विचारपूस केली.

गलवान खोऱयातील संघर्षात जखमी झालेल्या जवानांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

पंतप्रधान किंवा लडाखी, कुणीतरी खोटं बोलतंय
लडाखमध्ये चीनने घुसखोरी केलेली नाही, असा दावा पंतप्रधान मोदींनी केला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘लडाख स्पीक्स’ नावाने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये लडाखमधील नागरिक चीनने जमीन ताब्यात घेतल्याचा दावा करताना दिसत आहेत. यावरून पंतप्रधान किंवा लडाखी, कुणीतरी खोटं बोलतंय, असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

चीनची सावध प्रतिक्रिया; आपण चर्चा करतोय, मग असं कशाला करायचे?
पंतप्रधान मोदी यांच्या लडाख दौऱयावर चीनने अत्यंत सावध आणि मवाळ भुमिका घेतली आहे. हिंदुस्थानात आणि चीनमध्ये लष्करी आणि राजनैतिक पातळीवर संवाद सुरू आहे. तणाव कमी करण्याचे प्रयत्न होत आहेत. चर्चा करत असताना मग असे कशाला करायचे? दोन्ही देशांनी तणाव वाढणारे पाऊल उचलू नये असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी अचानक लडाखमध्ये गेले आणि चीन सीमेवरील जवानांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी नकाशावर नेमकी स्थितीही जाणून घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या