
देशात कोरोना संसर्गाची चिंता वाढल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सहाव्या टप्प्यातील मतदान होत असताना त्यांचा शुक्रवारचा नियोजित पश्चिम बंगाल दौरा रद्द केला. शुक्रवारी ते उच्च स्तरीय बैठक बोलावून त्यात देशभरातील कोरोना फैलावाच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. दिवसभरात त्यांच्या तीन बैठका होणार आहेत.
सकाळी 9 वाजता उच्चस्तरीय बैठक झाल्यानंतर ते कोरोनाचा भयंकर फैलाव झालेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता ऑक्सीजन उत्पादकांसमवेत व्हर्च्युअल बैठक घेणार आहेत. या महत्त्वाच्या बैठकांच्या पार्श्वभूमीवर मोदींनी आपला नियोजित पश्चिम बंगाल दौरा रद्द केला. त्यांनी गुरुवारी ट्विट करीत दौरा रद्द केल्याची माहिती दिली. बंगालच्या चार जिह्यांतील 56 विधानसभा जागांसाठी ते मुर्शिदाबाद, मालदा, बीरभूम आणि दक्षिण कोलकात्ता अशा चार ठिकाणी सभा घेणार होते. दरम्यान, त्यांनी पश्चिम बंगाल दौरा रद्द केला असला तरी ते सायंकाळी 5 वाजता व्हर्च्युअली बंगालच्या मतदारांशी संवाद साधणार आहेत. तसेच पुढील दिवसांत पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करणार नसल्याचे समजते.
मोदींच्या वाराणसीत प्राणवायू संपला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात कोरोनाची स्थिती भलतीच भीषण बनली आहे. येथे एकीकडे रुग्णसंख्या आटोक्यात येत नसताना रुग्णालयांमधील ऑक्सिजनचा साठाही संपला आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध होईपर्यंत कोरोनाच्या नवीन रुग्णांना दाखल करून घेऊ नका, असे स्पष्ट आदेश वाराणसीचे जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी रुग्णालयांना दिले आहेत. वाराणसीसह संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा भीषण उद्रेक झाला आहे. ऑक्सिजनअभावी राज्यातील कोरोनाबळींचा आकडा झपाटय़ाने वाढण्याची भीती आहे.


























































