भरधाव पीएमपीएलच्या धडकेत सुरक्षा रक्षक ठार, माणिक बागेजवळ झाला अपघात

file photo

भरधाव पीएमपीएल बस चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जेष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला.  सिंहगड रोडवर माणिकबाग येथे  अपघात झाला. भल्या सकाळी घटना घडल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. सिंहगड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत गर्दी कमी केली.

जयंत रामाजी महाडिक (वय 67, नर्हे) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जयंत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. सकाळी ते  माणिकबाग परिसरातून दुचाकीवरुन घरी जात होते. त्यावेळी स्वारगेट – नर्हे पीएमपीएल बस जात होती.

माणिकबाग येथील जगताप हॉस्पिटलच्या समोर बसने जयंत यांना धडक दिली. डोक्यावरून बसचे चाक गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या